#WomensDay एका भाषणाने मला राजकारणात महिला, युवतींसाठी काम करायची संधी मिळाली : सक्षणा सलगर

मी ज्या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य आहे. त्या मतदारसंघात १० पैकी पाच ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच आहेत. यातील दोन महिला शिक्षित आहेत. त्यामुळे त्यांचे काम चांगले आहे. राजकारण हे महिलांसाठी नवीन आहे. परंतु, करीअर म्हणून अद्याप महिला यामध्ये उतरलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे युवतींना या क्षेत्रात मोठी संधी आहे असे मतराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी व्यक्त केले (शब्दांकन: सयाजी शेळके)
Sakshana Salgar Talks About Women in Politics
Sakshana Salgar Talks About Women in Politics

हिलांना राजकीय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वारसा असावा लागतो असे नाही, तर स्वतःची इच्छाशक्ती, ध्येय गाठण्याची हिंमत असेल तर निश्चित महिला राजकीय क्षेत्रातही यशस्वी होऊ शकतात. मी सध्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष आहे.  केवळ मेहनत, धाडस आणि निष्ठा यामुळेच मला हे पद मिळाले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नवीन राजकारणात येणाऱ्यांनी जरूर या क्षेत्राकडे यावे. केवळ पैसे मिळविण्याचे साधन म्हणून नाही, तर समाजकारणात यशस्वी होण्याची इच्छा बाळगलेल्या महिलांना हे क्षेत्र निश्चित दिशादर्शक ठरेल, याचा मला विश्वास आहे.

महाराष्ट्रात महिलांसाठी राजकीय क्षेत्रात ५० टक्के आरक्षण आहे. याचा पुरेपुर फायदा घेतला पाहिजे. पण, दुर्दैवाने सध्या अनेक ठिकाणी महिलांचे पती, वडील, भाऊ राजकारण करतात. महिलांना केवळ खुर्चीत बसण्याचा सन्मान मिळतो. त्यावरच महिला समाधान मानतात. ५० टक्के आरक्षण ठेवण्यामागचा हेतूच महिलांना अद्याप कळालेला नाही. चांगल्या महिला राजकारणात येण्यासाठी युवतींनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी या क्षेत्राला करिअर म्हणून निवडले पाहिजे. जेव्हा या क्षेत्रात पूर्णपणे स्वतःला झोकून द्याल, तेव्हा खऱ्या अर्थाने महिलांमध्ये परिवर्तन झाल्याचे दिसून येईल. राजकारणात काम करताना अनेक अडचणी येतात, हे खरे आहे. पण, कोणत्याही संकटावर मात करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. 

वेळप्रसंगी परिस्थितीशी दोनहात करण्याची तयारी ठेवावी लागते. एकदा तुम्ही या क्षेत्रात येऊन हिंमतीने काम करायला लागलात, म्हणजे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. समाजात महिलांना अजूनही अपेक्षित स्थान नाही. ही मानसिकता बदलली पाहिजे. महिलांनी शिक्षण घेऊन पुढे आले पाहिजे. महिला डॉक्टर, इंजिनिअर, वकील अशा क्षेत्रात स्वतःचे स्थान स्वतःच्या पायावर बळकट करीत आहेत.  मात्र राजकारणात हुशार महिला कमी असल्याचे दिसत आहे. केवळ आरक्षण आहे, म्हणून चला निवडणूक लढवायची आहे, अशा महिलांचा वर्ग जास्त आहे. त्यामुळे राजकारणात अजूनही महिलांना अपेक्षित मान, सन्मान मिळत नाही, किंबहुना त्यामुळेच समाजमान्यता मिळत नसल्याचे सध्या तरी दिसते.   

करियर म्हणून राजकारणात या

मी ज्या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य आहे. त्या मतदारसंघात १० पैकी पाच ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच आहेत. यातील दोन महिला शिक्षित आहेत. त्यामुळे त्यांचे काम चांगले आहे. राजकारण हे महिलांसाठी नवीन आहे. परंतु, करीअर म्हणून अद्याप महिला यामध्ये उतरलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे युवतींना या क्षेत्रात मोठी संधी आहे. राजकीय क्षेत्रात येताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहता आले पाहिजे, याचा विचार करूनच मैदानात उतरले पाहिजे. मला मोठा राजकीय वारसा नाही. तरीही करीअर म्हणून मी राजकारणात आहे. 

मी लहानपणापासून राजकारणात जाण्याचा निश्‍चय केला होता.  यश येईल की नाही? याची भिती नव्हती. यश आले तर माझी वेगळी ओळख तयार होणार होती. अन नाही आले तर मी आहे, त्याच ठिकाणी राहणार होती. मात्र मी कष्ट केले, मेहनत घेतली त्यामुळे मला यश आणि राजकारणात चांगले स्थान मिळाल्याचे समाधान आहे. एवढ्यावरच न थांबता मला जी संधी मिळाली आहे, त्यातून समाजासाठी आपण काही देणे लागतो याचा मनात   नेहमी विचार असतो.  त्यासाठी माझ्या जिल्हा परिषद क्षेत्रात जास्तीत जास्त निधी खेचून आणून विविध योजना राबविण्याचा माझा प्रयत्न सुरू असतो. त्यालाही बऱ्यापैकी यश येत आहे. मी इंजिनिअर असूनही मला राजकारणाची आवड असल्याने अनेकांना माझा निर्णय संयुक्तिक वाटत नव्हता. पण, माझी इच्छाशक्ती मला गप्प बसू देत नव्हती.

सुप्रियाताईं मुळे राज्यात संधी

२०१२ मध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली. केवळ १२० मतांनी निसटसा पराभव झाला. त्यानंतर एकदा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उस्मानाबाद शहरात आल्या होत्या. युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मला बोलण्याची संधी मिळाली. माझ्या भाषणाने प्रभावित झालेल्या सुप्रियाताईंनी माझी प्रशंसा केली. मला मुंबईला बोलावून घेतले. अन तेथून पुढे माझ्या राजकीय प्रवास सुरू झाला. शॉर्टकट शोधून चालत नाही, हा आई-वडीलांचा आशिर्वादरुपी दिलेला सल्ला कायमच आठवतो, त्यातून मी पुढे जाते. २०१७ मध्ये सुप्रियाताईंच्या आग्रहाने मला अन्य जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. खासदार सुळे यांनी स्वतः येऊन प्रचारसभा घेतली. पाडोळी सर्कल मधून मी भरघोस मतांनी निवडून आले. जिल्हा परिषद विजयानंतर सुप्रियाताईंनी मला पुढचे बक्षीस देत युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. आता मला राज्यभर काम करण्याची संधी मिळत आहे.  

( शब्दांकन: सयाजी शेळके)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com