"सकाळ इंडिया फाउंडेशन' कडून " माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजना' - sakal india foundation | Politics Marathi News - Sarkarnama

"सकाळ इंडिया फाउंडेशन' कडून " माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजना'

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 जुलै 2019

पुणे : शिक्षणामुळे प्रगतीचे, आत्मसन्मान मिळविण्याचे अनेक मार्ग खुले होतात. मात्र राज्यातील ग्रामीण भागातील मुलांना केवळ थोड्या पैशांअभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागते. शहरी भागातील मुलांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे या उद्देशाने "सकाळ माध्यम समूहा'तील "सकाळ इंडिया फाउंडेशन' यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पुण्याचे धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांच्या सहकार्याने "माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजना' सुरू करत आहे. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी वार्षिक दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. 

शिष्यवृत्तीच्या रकमेचा वापर विद्यार्थ्याने फक्त शैक्षणिक खर्चासाठी करणे आवश्‍यक आहे. या योजनेसाठी शैक्षणिक गुणांची अट नाही, मात्र विद्यार्थी कमी उत्पन्न गटातील असावा. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी अर्जदाराने निकषांची पूर्तता करणारी कागदपत्रे सादर करणे आवश्‍यक आहे. प्राथमिक टप्प्यात या उपक्रमासाठी रयत शिक्षण संस्था व अन्य काही नामांकित शैक्षणिक संस्थांच्या मदतीने लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. पुण्यातील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवराज कदम- जहागीरदार यांनी 25 विद्यार्थी दत्तक घेऊन या उपक्रमाची सुरवात केली आहे. 
असे आहेत निकष 
- योजनेचा लाभ पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना घेता येईल 
- विद्यार्थी कमी उत्पन्न गटातील असावा 
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य 
ही कागदपत्रे सादर करा 
- शाळेच्या मुख्याध्यापकांचे पत्र 
- कमी उत्पन्न गटासंबंधीचा तलाठी/तहसीलदाराचा दाखला 
- विद्यार्थ्यांचे आधार कार्ड 
- पालकांचे हमी पत्र 
फाउंडेशनकडून आर्थिक मदतीचे आवाहन 
समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योजक, खासगी कंपनी व आस्थापनांना सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून "माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजना' उपक्रमाला आर्थिक मदत करून यात सहभागी होण्याचे आवाहन "सकाळ इंडिया फाउंडेशन' करीत आहे. दहा हजार रुपयांची देणगी देऊन एका विद्यार्थ्याचे वार्षिक शैक्षणिक पालकत्व घेता येईल. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व देणगीदारांना कलम 80 जी नुसार प्राप्तिकरात 50 टक्के सवलत मिळेल. मदतीचे धनादेश "सकाळ इंडिया फाउंडेशन' या नावाने "सकाळ'च्या शिवाजीनगर कार्यालयात रोज सकाळी 10.30 ते 5 या वेळेत (रविवार व सुटीचे दिवस वगळून) स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी संपर्क ः 8605017366 

ट्रस्ट सहकार्य करणार... 
ग्रामीण भागातील माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजना हा "सकाळ इंडिया फाउंडेशन'चा अतिशय चांगला उपक्रम आहे. त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास मदत होणार आहे. अशा समाज विधायक उपक्रमास श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे सहकार्य राहील असे श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. शिवराज कदम- जहागीरदार यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख