Saibaba punishment a shock to leftist movement | Sarkarnama

साईबाबाच्या जन्मठेपेने डाव्या चळवळीला धक्का 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 मार्च 2017

काही वर्षांपूर्वी प्रा. विनायक सेन यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा आरोप खोडून काढला. 

नागपूर :माओवादी "थिंक टॅंक'मधील अग्रणी नाव असलेल्या प्रा. जी. एन. साईबाबा यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने या भागातील डाव्या चळवळीला जबर धक्का बसला आहे. 

पश्‍चिम बंगालमधून सुरू झालेल्या नक्षलवादी चळवळीला या वर्षी 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. पश्‍चिम बंगालमधील नक्षलबारी या गावातून डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या चारू मुजुमदार यांच्या नेतृत्वात ही चळवळ सुरू झाली. पश्‍चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगडमार्गे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात या चळवळीने जोर पकडला. जवळपास 1980 च्या दशकात या नक्षलवादी चळवळीने या जिल्ह्यात पाय रोवायला सुरूवात केली. या जिल्ह्यातील जवळपास आठ तालुक्‍यांमध्ये नक्षलवाद्यांचा चांगलाच प्रभाव आहे. 

या चळवळीचे बौद्धिक व वैचारिक रसद पुरविण्याचे काम प्रा. साईबाबा करीत होते, एवढेच नव्हे तर देशविरोधी कारवायांमध्ये प्रा. साईबाबा यांचा थेट हात होता, असेही न्यायालयाने म्हटले आहे. प्रा. साईबाबा हे 90 टक्के अपंग आहेत. ते व्हीलचेअरशिवाय हलू शकत नाही.

त्यांना मदतनीसाशिवाय शरीराच्या हालचालीही करता येत नाही. ही स्थिती असताना न्यायालयाने प्रा. साईबाबा यांना दोषी ठरविल्याने डाव्या चळवळीला हा मोठा धक्का बसला आहे. काही वर्षांपूर्वी प्रा. विनायक सेन यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा आरोप खोडून काढला. 
या निकालात प्रा. साईबाबा यांच्यासह सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने या भागातील डाव्या चळवळीशी सहानुभूती राखणाऱ्यांना जोरदार धक्का बसला आहे.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख