हिंदूद्वेष्टे म्हणणाऱ्यांना पवारांचे ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेऊन सूचक उत्तर - sahrad pawar took darshan of dyaneshwar maharaj samadhi | Politics Marathi News - Sarkarnama

हिंदूद्वेष्टे म्हणणाऱ्यांना पवारांचे ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेऊन सूचक उत्तर

विलास काटे
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

...

आळंदी : विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायचे असते. माउलींच्या दर्शनाला आळंदीला जायचे असते. संत तुकारामांचे दर्शनासाठी देहूला जायचे असेल तर कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात बहिष्काराची भूमिका घेणाऱ्यांना टोला लगावला.

केवळ कोणी सांगितलं की, तुम्हाला परवानगी नाही, त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. सच्चा वारकरी अशी भूमिका कधी घेणार नाही. म्हणून त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. लहानसहान गोष्टी होतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला जो रस्ता पसंद आहे त्यावर प्रामाणिकपणे पुढे जायचे आणि तिच्याशी बांधीलकी ठेवायची असते. त्याच्याशी तडजोड करायची नसते, या भावनेने मी आळंदीत आलो, असे सूचक उत्तर त्यांनी काढले.

पंढरपुरातील राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वादग्रस्त पत्राला या प्रकारे उत्तर देत त्यांनी या वादावर पडदा टाकला. पवार यांच्याविषयी पंढरपुरातून वारकरी परिषद आणि निवृत्ती वक्ते यांनी नुकतेच वादग्रस्त पत्रक काढले होते. पवार हे हिंदूविरोधी असून त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका,असा दावा या परिषदेने केला होता. त्या पत्रकाचा आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांनी दोन दिवसांपूर्वी निषेधही केला होता. सर्वांना उत्सुकता होती ती शरद पवार याबाबत काय भूमिका घेतात त्याची.

त्याला अनुसरून श्री. पवार यांनी आज आळंदीत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यात त्यांच्या खास शैलित उत्तर दिले. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, मारोती महाराज कुऱ्हेकर, आमदार दिलिप मोहिते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. पवार यांनी लहानपणापासून मामासाहेब सोनोपंत दांडेकर आणि वारकरी संप्रदायाशी त्यांचा संबंध आल्याचे सांगितले. आईच्या सांगण्यावरून इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आषाढी वारीत वारक-यांसाठी घरातून भाकरी बांधून आणत असल्याचेही सांगितले. मुख्यमंत्री असताना तीर्थक्षेत्रांसाठी निधी पुरवून विकासाचा संकल्प केला. मात्र केलेल्या कामाची कधी जाहिरातबाजी केली नाही असेही सांगायला ते विसरले नाहीत.

आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेशी चाळिस वर्षांचा ऋणानुबंध असून पवार साहेबांनी संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात यापूर्वी अठरा लाख रूपयांची देणगी जाहीर केली होती. तसेच वारकरी शिक्षण संस्थेच्या आळंदीतील नव्या इमारतीचे उद्गटानही केले. आज आळंदीतील चाकण चौकाचे नामकरण जोग महाराज असे करण्यात आले.

दरम्यान कार्यक्रमाला येण्यापूर्वी श्री.पवार यांनी आळंदीतील माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी देवस्थानच्यावतीने प्रमुख विश्वस्त अॅड विकास ढगे यांनी त्यांचा शाल ज्ञानेश्वरी देत सन्मान केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख