sadashivrao patil and ncp | Sarkarnama

पवार साहेबांबरोबरच्या " त्या ' सात आमदारांमध्ये माझे वडिल होते : सदाशिवराव पाटील

संपत मोरे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

................

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांना 1980 मध्ये सगळे आमदार सोडून गेले होते. त्यांच्यासोबत फक्त सात आमदार राहिले. त्या सात आमदारांमध्ये माझे वडील लोकनेते हणमंतराव पाटील होते, याचा मला अभिमान आहे अशी भावना माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताना व्यक्त केली. 

 

कॉंग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी बारामतीचे पवार घराणे आणि विट्याचे पाटील घराणे यांच्यातील ऋणानुबंध सांगितले. 1980 मध्ये शरद पवार यांना सोडून सगळे आमदार गेले. फक्त सात आमदार त्यांच्याबरोबर राहिले होते. त्यात हणमंतराव पाटील होते. त्यांनी पवार साहेबांना साथ दिली होती असे सांगून पाटील म्हणाले," तो दिवस मला आजही आठवतो रात्री साडेबारा वाजता पवार साहेब आमच्या वडिलांना भेटायला आले होते. त्यांनी खेराडकर यांच्या दुकानाच्या समोर बसून माझ्या वडिलांना "तुम्ही माझ्यासोबत या.' असे सुचवले. माझे वडील त्यावेळी लगेच तयार झाले. त्यांनी स्वतःच्या लेटरपॅडवर पवार साहेबांना माझा पाठींबा आहे.' असे लिहून दिले. शरद पवार अडचणीत असताना माझे वडील त्यांच्या सोबत राहिले. माझ्या वडिलांचा या गोष्टीबद्दल अभिमान आहे असे पाटील म्हणाले. 

"1985 च्या निवडणुकीत माझ्या वडिलांचा प्रचार करण्यासाठी शरद पवार यांनी रात्री दहाची वेळ दिली होती. मात्र त्यांना इतर ठिकाणच्या सभेमुळे उशीर झाला. विट्यात रात्रभर लोक बसून होते. सगळ्या सभा करून पहाटे पाच वाजता पवारसाहेब आले आणि त्यांनी सभा घेतली. पहाटे पाच वाजेपर्यंत हजारो लोक साहेबांची सभा ऐकायला थांबले होते अशीही आठवण पाटील यांनी यावेळी सांगितली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख