Sadabhau Khot trying to win over Shahuwadikars with dinner diplomacy | Sarkarnama

राजू शेट्टींच्या बालेकिल्ल्यात सदाभाऊंची  शाहूवाडीकरांना पूरणपोळी !

राजेंद्र पाटील 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

.लोकसभा निवडणुकीत शेट्टींना आव्हान देण्यासाठी खोत कामाला लागले आहेत.

 फुलेवाडी :  कृषी,स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी शाहूवाडी तालुक्यात कमालीचा जनसंपर्क वाढविला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांच्याशी संपर्क ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या घरी विकास कामांचा आढावा घेण्यासाठी व नियोजन करण्यासाठी जि.प व पं स.सदस्यांना निमंत्रित केले. विकासकामांवर चर्चा झाली.घरी आलेल्या पाहुण्यांना पुरणपोळीचे गोड जेवण घालून शाहूवाडीकरांचे आदरतिथ्यही केले.

खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यात वर्षभरापासून चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे.लोकसभा निवडणुकीत शेट्टींना आव्हान देण्यासाठी खोत कामाला लागले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टी यांना गेल्या दोन्ही निवडणुकांत शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक मताधिक्य दिले. ही बाब लक्षात घेऊन खोत यांनी शाहुवाडी तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.

जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्यांना विश्वासात घेऊन वाड्या वस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजना झालेल्या नाहीत ,ज्या गावातील योजना अर्धवट,नादुरुस्त आहेत त्यांचे प्रस्ताव देण्याचे आवाहन केले. शाहूवाडी सारख्या डोंगरी तालुक्यात स्वातंत्र्यानंतरही ज्या वाड्यावर पिण्याच्या पाण्याची सोय झालेली नाही तेथे प्राधान्याने ती सोय करण्याचा त्यांचा मानस आहे.

त्यादृष्टीने आंबा, शित्तुर वारुण, पिशवी आदी विभागाचा त्यांनी दौरा पूर्ण केला. तालुक्यातील प्रमुख गावात हायमास्ट दिवे देण्याचे खोत यांनी आश्वासन दिले आहे.दलित वस्ती सुधारणा व जनसुविधा फंड योजनातून कामे मार्गी लावली जाणार आहेत. राज्यमंत्री खोत यांच्याशी जिल्हा परिषद सदस्य पै.विजय बोरगे यांची चांगलीच जवळीक निर्माण झाली आहे.बोरगेंना समवेत घेऊन विकास कामांचा पाठपुरावा केला जात आहे. वाड्या-वस्त्यांवरील विकास कामे मंजूर करून घेण्यासाठी पै. बोरगे प्रयत्न करत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख