Sadabhau Khot trolled for double standards | Sarkarnama

सदाभाऊ खोतांचे जेवण चारा छावणीत अन विश्रांती पंचतारांकीत हॉटेलात !

राजेभाऊ मोगल 
बुधवार, 15 मे 2019

सकाळी शहरात दाखल होताच त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबून आंघोळ आणि नाश्‍ता केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून आता सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. 

औरंगाबाद : दुष्काळी दौऱ्यासाठी शहरात दाखल झालेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत लासूर स्टेशनच्या चारा छावणीत पशुपालकांसोबत जमीनीवर बसून जेवले. त्यांच्या या साधेपणाचे कौतुक होत नाही तोच सकाळी शहरात दाखल होताच त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबून आंघोळ आणि नाश्‍ता केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून आता सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. 

लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर विरोधकांनी दुष्काळ दौरे सुरु करताच त्यांच्यापाठोपाठ सत्ताधाऱ्यांनीही दुष्काळाची पाहणी सुरु केली. ऐन निवडणुकीच्या मौसमात दुष्काळ, शेतकरी यांच्याबाबत बोलण्यास वेळच मिळाला नसल्याने किमान आता तरी त्यांच्याशी संवाद हवा, म्हणून सर्वत्र मंत्र्यांचे दौरे सुरु झाले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील पाहणी करण्यासाठी बुधवारी पहाटे देवगीरी एक्‍सप्रेसने कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत दाखल झाले. दुष्काळ दौऱ्याचे भान ठेवून त्यांनी साधेपणाने राहणे अपेक्षित असतांना पंचतारांकित हॉटेलात उतरणे पंसत केले. अंघोळ आणि सकाळचा नाश्‍ता घेऊन ते चारा छावणी व दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेले. 

विशेष म्हणजे दुपारी खोत यांनी चारा छावणीत पशुपालकांसोबत जमीनीवर बसूनच जेवण घेतले. त्यांच्या या साधेपणाची आणि शेतकऱ्यांबद्दल असलेल्या सहानुभूतीची चर्चा होत असतांनाच त्यांच्या पंचातारांकित हॉटेलातील आंघोळ आणि नाश्‍त्याची माहिती समोर आली. यावरून खोत सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. 

" खोत यांच्या संवेदना बोथट झाल्या असून त्यांचा दुष्काळी दौरा हा एक दिखावा असल्याची टिका शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली. भेटी देऊन काय उपयोग होणार आहे ?  उलट दौऱ्यावर लाखो रुपयांचा चुराडा उडविला जाईल. त्याऐवजी तीन महिने पुरेल एवढे धान्य द्यायला हवे", अशी मागणी देखील सुर्यवंशी केली.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख