sadabhau khot | Sarkarnama

आंबा महोत्सवाच्या माध्यमातून सदाभाऊ खोत पुन्हा कार्यरत 

तुषार खरात 
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुंबई : जिल्हा परिषद निवडणुकीमधला मुलाचा पराभव, ऐन विधीमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर खासदार राजू शेट्टी यांनी छेडलेले आंदोलन, मंत्री झाले अन्‌ शेतकरयांना विसरले असा जनमानसांतून होऊ लागलेला आरोप...अशा कैचीमध्ये सापडलेले कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आता मात्र पुन्हा कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. 
कोकणातील आंबा उत्पादक शेतकरयांसाठी नवी मुंबईत खारघर व सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये आंबा महोत्सव भरविण्यात येणार आहे. याशिवाय नाशिक, औरंगाबाद, पुणे या ठिकाणीही आंबा महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे महोत्सव यशस्वी करण्यासाठी खोत यांनी कंबर कसली आहे. 

साधारण वर्षभरापूर्वी राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर खोत यांनी आठवडी बाजार सुरू करण्याचा धडाका लावला होता. पुणे, ठाणे, मुंबई अशा महानगरांमध्ये मोक्‍याच्या जागा हेरून त्या ठिकाणी पणन विभागामार्फत आठवडी बाजार भरविण्यास सुरूवात झाली. या आठवडी बाजारांचा मोठा गाजावाजा झाला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदाभाऊ खोत यांची ही संकल्पना उचलून धरली. सदाभाऊ आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध अधिकाधिक वृद्धिंगत होऊ लागले. एका बाजूला मुख्यमंत्र्यांच्या अधिकाधिक जवळ जाऊ लागलेले सदाभाऊ खासदार राजू शेट्टी यांच्यापासून मात्र दुरावत गेले. 
अशातच सदाभाऊंनी स्वत:च्या मुलाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरविले. घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करीत खासदार शेट्टी यांनी सदाभाऊंच्या मुलाचा उमेदवारीला जाहीर विरोध केला. परिणामी सदाभाऊंच्या चिरंजिवाला निसटता पराभव चाखावा लागला. हा पराभव सदाभाऊंच्या जिव्हारी लागला. तूर खरेदी होत नसल्याने, पुरेसा भाव मिळत नसल्याने खासदार शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विधीमंडळाच्या बाहेर आणि अधिवेशनात आंदोलन केले. शेट्टी व सदाभाऊ यांच्यातील संबंध अधिकच ताणले गेले. 
या सगळ्या तणावामुळे सदाभाऊ काहीसे बॅकफूटला गेल्याचे चित्र होते. नवा उपक्रम किंवा योजना त्यांनी अनेक महिनापासून आणलीच नाही. त्यांच्या उत्साह सुद्धा मावळल्याचे दिसत होते. आता परत त्यांनी आंबा महोत्सवांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरवात केली आहे. सदाभाऊ पुन्हा पहिल्यासारखा झंझावात सुरू करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख