sachin pilot next cm of rajastan | Sarkarnama

राजस्थानचे "पायलट' सचिन व्हावेत ! 

प्रकाश पाटील 
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

भाजपचे हेवी वेट मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याविरोधात वातावरण निर्मिती करून संपूर्ण राजस्थान ढवळून काढणारे कॉंग्रेस युवा नेते, माजी केंद्रीय मंत्री, दोन वेळा खासदार आणि आता टोंक मतदारसंघातून आमदार बनलेले सचिन पायलट हे राजस्थानचे मुख्यमंत्री व्हावेत असे या राज्यातीलच नव्हे देशातील तरूणाईला वाटते. मात्र याबाबत निर्णय खुद्द राहुल गांधी घेतील. 

भाजपचे हेवी वेट मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याविरोधात वातावरण निर्मिती करून संपूर्ण राजस्थान ढवळून काढणारे कॉंग्रेस युवा नेते, माजी केंद्रीय मंत्री, दोन वेळा खासदार आणि आता टोंक मतदारसंघातून आमदार बनलेले सचिन पायलट हे राजस्थानचे मुख्यमंत्री व्हावेत असे या राज्यातीलच नव्हे देशातील तरूणाईला वाटते. मात्र याबाबत निर्णय खुद्द राहुल गांधी घेतील. 

 राजस्थानात मुख्यमंत्रीपदाचे दुसरे एक उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. मात्र ते यापूर्वी मुख्यमंत्री राहिले आहेत. राजस्थानात सत्ता गेल्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यात तरूण चेहरा म्हणून पायलट यांना पाठविले तर गेहेलोत यांना आपल्या सोबत घेऊन देशातील निवडणुकीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली होती. गेहेलोत यांनी गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून यापूर्वी झालेल्या गुजरात आणि कर्नाटक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. कॉंग्रेसच्या "थिंक टॅंक'मध्ये गेहलोत सहभागी झालेले आहेत. 

राजस्थानच्या जात समीकरणाचा विचार केला तर गेहलोत हे ओबीसी समाजाचे म्हणजे सैनी आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील माळी समाज. तर दुसरीकडे पायलट हे गुजर आहेत. या दोन्ही जातीचा विचार न करता या दोघांनी राजस्थानात सत्ता आणण्यासाठी परिश्रम केले आहेत. तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ सी.पी. जोशी यांनीही प्रचारात धुरळा उडवित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केली होती त्याने वाद निर्माण झाला होता. 

आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार केला गेहलोत यांना आपल्या बरोबर ठेवण्याकडे राहुल गांधींचा कल दिसतो आहे. सचिन पायलट मुख्यमंत्री बनल्यास आगामी वर्षभरात तेही तरूण नेता म्हणून देशभर मैदान गाजवू शकतात. पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचाही देशभर चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर राजस्थानचे मुख्यमंत्री सचिन पायलट व्हावे असे वाटते आहे. शेवटी ही कॉंग्रेस आहे. ते कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपद घालतात याची मात्र प्रत्यक्षा करावी लागणार आहे. 

गेहलोत यांचे राज्यात समर्थक आहेत. तेथील छोटे छोटे पक्षही त्यांच्याबाजूचे आहेत. असेही होऊ शकते की गेहेलोत मुख्यमंत्री आणि पायलट उपमुख्यमंत्री बनू शकतात. जर पायलट मुख्यमंत्री बनले तर गेहेलोत दिल्लीतच राहुल यांच्या सोबत असतील. पायलट ज्यूनियर असून गेहेलोत त्यांच्या नेतृत्वाखाली कदापी काम करणार नाहीत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख