विदर्भातील युवा नेता सचिन नाईक टीम प्रियांकामध्ये - Sachin Naik From Vidarbha now in Team Priyanka | Politics Marathi News - Sarkarnama

विदर्भातील युवा नेता सचिन नाईक टीम प्रियांकामध्ये

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

कॉंग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या टिममध्ये विदर्भातील युवा नेता अॅड. सचिन नाईक यांचा समावेश झाला आहे. अचानकपणे समोर आलेले सचिन नाईक कोण? असा प्रश्‍न आता अनेक कॉंग्रेसजणांना पडला आहे.

नागपूर : कॉंग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या टिममध्ये विदर्भातील युवा नेता अॅड. सचिन नाईक यांचा समावेश झाला आहे. अचानकपणे समोर आलेले सचिन नाईक कोण? असा प्रश्‍न आता अनेक कॉंग्रेसजणांना पडला आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे पूर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या मदतीसाठी तीन चिटणीसांची नियुक्ती राहुल गांधी यांनी केली आहे. अत्यंत विश्‍वासातील व कॉंग्रेसच्या निष्ठावंतांची निवड या पदासाठी करण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांना सहकार्य करण्याची जबाबदारी या तीन चिटणीसांवर राहणार आहे. या तीन चिटणीसांमध्ये दोन मराठी युवक आहेत, हे विशेष आहे. यात काही दिवसापूर्वी बाजीराव खाडे यांची नियुक्ती झाली आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. बुधवारी सचिन नाईक यांची प्रियांका गांधींना मदत करण्यासाठी अ. भा. कॉंग्रेस समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिन नाईक हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्‍यातील फुलसावंगी येथील आहेत. त्यांचे आजोबा सटवाराव नाईक स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते व कॉंग्रेसचे जिल्ह्यातील मोठे प्रस्थ होते. धनगर समाजातील सचिन नाईक यांनी नागपुरातून एलएलबीची पदवी घेतली आहे. ४६ वर्षीय सचिन नाईक विद्यार्थी दशेपासून ते एनएसयूआयशी जुळलेले होते. त्यांनी युवक कॉंग्रेसमध्येही काम केले. यानंतर २००८ मध्ये त्यांची राजीव गांधी पंचायत राज समितीमध्ये नियुक्ती झाली. तेथे त्यांनी विविध राज्यांमध्ये काम केले आहे. या माध्यमातून आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यांमध्ये कॉंग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या कामामुळे त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा विश्‍वास संपादन केला. विदर्भातील राजकारणात कुठेही समोर नसलेल्या या तरुण नेतृत्वाने कॉंग्रेस श्रेष्ठींचा विश्‍वास संपादन केल्यामुळे त्यांच्याकडे थेट सचिव म्हणून प्रियांका गांधींसोबत करण्याची संधी मिळाली आहे.

त्यांचे सहकारी व नागपुरातील कॉंग्रेसच्या लिगल सेलचे प्रमुख अक्षय समर्थ म्हणाले, "सचिन नाईक हे कॉंग्रेसच्या विचारधारेचे पाईक आहेत. पदाची कोणतीही अपेक्षा न धरता केलेल्या कामाची पावती त्यांना मिळाली आहे. प्रियांका गांधी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे ही मोठी बाब आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख