रुपाली चाकणकर- स्वाती पोकळे वाद मिटला!

चाकणकर-पोकळे ही दोन्ही घराणी धायरीतील बडे प्रस्थ मानली जातात. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून चाकणकर-पोकळे ही मंडळी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहेत.
Rupali Chakankar - Swati pokale dispute resolved
Rupali Chakankar - Swati pokale dispute resolved

पुणे : पाडापाडी, अडवाअडवीचया राजकारणात माहीर असलेल्या पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवल घडलयं; राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि पुणे शहराध्यक्ष स्वाती पोकळे यांच्यात मनोमिलन घडलयं ! आपल्यातील मत आणि मनभेद बाजुला करीत, एकमेकींच्या कार्यक्रमांचे निमंत्रण स्वीकारत या दोघींजणी एका व्यासपीठावर दिसू लागल्या आहेत.

एवढेच नव्हे तर, "रुपालीताईंचे काम चांगले असल्याने मी त्यांना 'फॉलो' करीत आहे' असे स्वातीताई उघडपणे बोलत आहेत. आधी फटकून वागणाऱ्या रुपालीताईही नेहमीच स्वातीताईंच्या दिमतीला येत आहेत. परिणामी, चाकणकर-पोकळे गटांना खतपाणी घालणारे बुचकळ्यात पडले आहेत. 

चाकणकर-पोकळे ही दोन्ही घराणी धायरीतील बडे प्रस्थ मानली जातात. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून चाकणकर-पोकळे ही मंडळी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहेत. स्वाती पोकळे यांचे सासरे राणोजी पोकळे हे धायरीचे सरपंच होते; तर रुपाली चाकणकरांच्या सासूबाई रुक्‍मणी (नानी) चाकणकर या नगरसेविका होत्या. पुढे या दोन्ही घरण्यांतून रुपालीताई आणि स्वातीताई राजकारणात उतरल्या. तेव्हा महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत धायरीतून रुपालीताईंना राष्ट्रवादीचे तिकिट मिळाले. मनसेच्या झंझावातात चाकणकरांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर सक्रिय झालेल्या स्वातीताई या रुपालीताईंसाठी डोकेदुखी ठरल्या. 

चाकणकरांना रोखण्यासाठी पक्षातील काहीजणांनी स्वातीताईंना राजकीय ताकद दिली. महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत रुपालीताईंना मागे हटवून स्वातीताईंनी तिकिट घेतले. मात्र; त्याही पराभूत झाल्या. त्यामागे चाकणकरांचा हात असल्याचा संशय बळावला आणि चाकणकर-पोकळे यांच्यातील राजकीय संघर्षाला वादाची फोडणी मिळाली. या निवडणुकीपासून चाकणकर-पोकळे एकमेकींना पाण्यात पाहून लागल्या. 

खडकवासल्यात खासदार सुप्रिया सुळेंसाठी झटल्याने 2014 मध्ये महिला आघाडीचे शहराध्यक्षपद चाकणकरांकडे आले. त्यानंतर आपल्या कामाच्या बळावर चाकणकर चर्चेत आल्या आणि पोकळेंनी शांत राहाणे पसंत केले. चाकणकरांकडील शहराध्यक्षपदाची मुदत संपण्याआधीच हे पद खेचण्यासाठी पोकळेंनी पक्षात मजबूत 'फिल्डिंग' लावली. राजकीय खेळी करीत, आघाडीचे शहराध्यपद मिळविण्यात पोकळेंना यश आले. त्यानिमित्ताने चाकणकरांविरोधातील दुसरीही 'इनिंग'ही पोकळेंनी जिंकली. शहराध्यपद काढल्याने चाकणकर समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. पदाची मुदत संपल्याने चाकणकरांची जबाबदारी काढल्याचे स्थानिक नेत्यांनी जाहीर केले. मात्र, हे पद आपल्या विरोधक पोकळेंकडे गेल्याने चाकणकर स्थानिक नेतृत्वावर संतापल्या. खडकवासल्यातून विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या चाकणकरांना पद गेल्याने धक्का बसला. मात्र, चाकणकरांच्या विशेषत: आंदोलनाच्या 'स्टाईल'वर खूष असलेल्या प्रदेश नेतृत्वाने त्यांच्याकडे आघाडीचे प्रदेशाध्यपद सोपविले.

राज्यभर फिरून चाकणकरांनी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे लक्ष वेधून घेतले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांसोबत प्रचार दौरे करीत, चाकणकर राज्यभर चर्चेत आल्या. तरीही, पोकळेंना त्या आपल्या विरोधकच मानत राहिल्या. प्रचाराच्या रणधुमाळीत वेळ काढून पुण्यात आलेल्या चाकणकरांनी महिला आघाडीत पोकळेंच्या जोडीला आपल्या समर्थक मृणालिनी वाणींना नेमून त्यांच्याकडे कार्याध्यक्षपद दिले. यानिमित्ताने पोकळेंना एकप्रकारे आव्हान दिले गेले. मात्र, आपल्यातील वाद विसरून चाकणकर-पोकळे आता एकत्र आल्या आहेत. 

  • चाकणकर म्हणाल्या, "स्वाती यांच्याशी राजकीय संघर्ष नव्हता. आमच्याकडे गजबाजी नसते, पवारसाहेबांच्या आदेशानुसार पक्ष संघटना वाढवत आहोत. पुण्यात महिला आघाडी सक्रिय राहण्यासाठी आम्ही दोघीजणी एकत्र चांगले काम करीत आहोत.'' 
  • पोकळे म्हणाल्या, "रुपालीताईंकडे मोठी जबाबदार असल्याने सुरवातीला त्यांना पुण्यात वेळ देता येत नव्हता; मात्र त्या पुण्यात राहातात तेव्हा कार्यक्रमांना आर्वजून येतात. दोघींमध्ये कधीच वाद नव्हता. तो पुढेही राहणार नाही.''
     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com