Rubal Agarwal Working Hard in Fighting with Corona | Sarkarnama

रुबल आगरवाल म्हणतात....घाबरू नका पण खूप काळजी घ्या!

ज्ञानेश सावंत 
मंगळवार, 24 मार्च 2020

रोज झडनभर बैठका, 50-60 फोन, सूचना, आदेशांचे पत्रक, पुणेकरांची नियमित कामे आणि चार-पाच दिवसांतून डॉ. नायडू हास्पिटलमधलं जाणं-येणं आणि आपल्या स्वत:च्या कुटंबियांची काळजी...हे महापालिकेतल्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांचा 'रुटीन' झालं आहे. या साऱ्यांत रोज शंभर-सव्वाशे जणांच्या संपर्कात येणाऱ्या रूबल अगरवाल म्हणतात.....पुणेकरांना घाबरू नका, पण खूप काळजी घ्या...

पुणे. : पुण्यातल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा शुक्रवारी एकाच रात्री डझनभरांनी वाढला अन पुणेकरांच्या पोटात गोळाच आला.  कोरोनाच्या संसर्गाच्या नुसत्या चर्चेनं भल्याभल्याचं अंग गळून पडतयं. पण पुण्याच्या दिशेनं झेपावलेल्या या संकटात स्वत:सह अवघ्या पुण्याला सुरक्षित ठेवण्याची धडपड सरकारी यंत्रणा करतेय; त्यातल्या एक महिला अधिकारी म्हणजे, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल...

रुबल अगरवालांच्या घरी त्यांचा लहान मुलगा आणि अन्य कुटुंबिय आहेत. आपल्या कुटुंबियांची काळजी घेतानाच कोरोना विरोधातल्या मोहिमेत त्यांनी स्वत:ला झोकून दिलयं. ऑस्ट्रेलियातून येऊन पुणेकरांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या महापालिकेतल्या तिघा अधिकाऱ्यांना रुबल अगरवाल यांनी धडा शिकविला आणि त्या सोशल मीडियावर हिट झाल्या.  परदेशातून आलेल्या आणि विलगीकरण कक्षातून सोडलेल्यांना त्यांच्या घरी पोचविण्याच्या नियोजनाचा फोन रविवारी दीड वाजताचा फोन संपला आणि रुबल अगरवाल यांचं काम काही तासांसाठी थांबलं. 

पहाटेपासूनच पुन्हा फोनाफोनी, बैठकाचं 'शेड्युल' आलं आणि त्या सकाळी पावणे दहा वाजता महापालिकेत आल्या. हातातली पर्स टेबलवर ठेवतायेत तेवढ्यात विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातला फोन खणखणला. तो एका बैठकीसाठी; तशाच त्या गाडीच्या दिशेने गेल्या आणि जिल्हाधिकारी-विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातल्या बैठकीची तयारी केली. बैठका, त्यातले निर्णय, अंमलबजावणीच्या सूचना, आढावा आणि पुढच्या नियोजनातच रुबल अगरवाल रात्री उशिरा आपलं घर गाठतात... 

पुण्यात 9 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि महापालिकेची यंत्रणा हबकली. त्यानंतरच्या दिवसागणिक कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला. महापालिकेतल्या सारेच वरिष्ठांनी आपल्या सुट्टया रद्द केल्या त्यात रुबल अगरवाल आहेत. 

जेव्हा परदेशातून रोज शेकडो प्रवास पुण्यात येत होते, तेव्हा त्यांची तपासणी, विलगीकरण कक्षात दाखल करणं, त्यांच्या उपचाराची देखरेखीचं नियोजन त्यांच्याकडे होते. त्यानंतर आता रोज सुमारे 25 ते 30 हजार लोकांची तपासणी, काही लक्षणे आढलेल्या रुग्णांना महापालिका किंवा 'होम क्वारंटाइन' करणं याकडंही रुबल अगरवाल तितकच लक्ष देतात. 

या रुटीनमधून वेळ काढून त्या महापालिकेत थांबत, तिथं बैठका घेतात आणि अनेकदा विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या बैठकांन हजर राहून त्या-त्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करतात. मंत्र्यांसह केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांच्या पथकासमवेतही त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरूच असतो. रुबल अगरवाल या 2008 च्या बॅचमधील 'आयएएस' अधिकारी आहेत. 

या आधी त्या अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी शिर्डी देवस्थानच्या 'सीईओ' या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. दोन वर्षापूर्वी म्हणजे, जून 2018 मध्ये महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू झाल्या आहेत. 
रुबल अगरवाल म्हणतात, "सध्याची स्थिती पाहता पुणेकरांत विश्‍वास निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी, महापालिका आयुक्त शेखर गायाकवाड यांच्यासह सगळे अधिकारी रोज 16 ते 17 तास काम करीत आहेत. त्याचा मीही एक घटक आहे. पण या काळात प्रत्येकाने खूप काळजी घ्यायची आहे. तसे झाल्यास आपण कोरोनाला रोखू.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख