मोदी-शहा सदैव येणार नाहीत मदतीला ! संघाकडून भाजपला कानपिचक्‍या !!!

..............
मोदी-शहा सदैव येणार नाहीत मदतीला ! संघाकडून भाजपला कानपिचक्‍या !!!

नवी दिल्ली : प्रत्येक राज्याच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यावर विसंबून रहाण्याच्या प्रवृत्ती संबंधी संघाने भाजपच्या "केडर'ला कानपिचक्‍या दिल्या आहेत. संघाच्या ऑर्गनायजर या मुखपत्रातील संपादकीयमधून " मोदी-शहा नेहमीच निवडणुका जिंकून देऊ शकत नाहीत. त्यामुळे पराभवाच्या राज्यांत पक्षसंघटनेची पुनर्बांधणी व्हायला हवी,' असा कडक इशारा देण्यात आला आहे. दिल्ली भाजपवर तर तातडीने " केमोथेरपी' करण्याची गरज संघाने अधोरेखित केली आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने पंतप्रधानांसह देशभरातील तमाम बड्या बड्या नेत्यांची फौज उतरवली व धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रचार केला. मात्र अररविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपला अस्मान दाखवीत 70 पैकी 62 जागा जिंकल्या व भाजपला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दिल्लीच्या भाजप नेत्यांच्या अंतर्गत भांडणाना मोदी-शहादेखील रोखू शकले नाहीत. 

ऑर्गनायजरने भाजपच्या पराभवाचे विस्ताराने विश्‍लेषण केले आहे. पक्षसंघटनेचे पुनर्गठन हवे, हा सल्ला भाजपला देताना ऑर्गनायजरने दीनदयाळ उपाध्याय यांच्या उद्‌गाराचाही दाखला दिला आहे. लेखात म्हटले आहे की एक पक्षसंघटना म्हणून केवळ व केवळ मोदी-शहा यांच्या भरवशावर रहाता येणार नाही. विधानसभांच्या निवडणुकांमध्ये राज्यांतील भाजप संघटनांना पुढे येऊन प्रत्यक्ष लढाई लढावीच लागेल. स्थानिक जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिल्लीतील भाजप संघटनेचे पुनर्गठन केल्याशिवाय पर्यायच नाही. 2015 च्या पराभवानंतर अगदी प्राथमिक स्तरापासून बदल करण्यात भाजपला अपयश आले. कारण दिल्लीत निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पक्षाची भूमिका टिपेला नेणारा प्रचार करण्यात पक्षाला पूर्ण अपयश आले. 

मतदारांचा कल दिल्लीत भाजपने समजून घेतला नाही. शाहीनबागेच्या भोवती निवडणूक पिरविण्याची भाजपची रणनीती विजय मिळवून देणारी नव्हती. कारण केजरीवाल या मुद्यावर स्पष्ट भूमिका घेऊन दिल्लीच्या मतदारांसमोर गेले होते. त्याच वेळी त्यांचा "भगवा अवतार' भाजपने समजूनच घेतला नाही. सीएएच्या निमित्ताने मुस्लिम कट्टरपंथीयांबाबत भाजपने जी जी भाषा वापरली ती पक्षाच्याच अंगलट आली. केजरीवालांसाठी असे प्रयोग "नवे मैदान' तयार केल्यासारखे झाले. त्यांनी हनुमान चालीसा म्हणून त्याच मैदानावर झंझावाती खेळी केली, असेही निरीक्षण संघाने नोंदवले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com