Rohit Pawar will take action against fertilizer and seed stockists | Sarkarnama

खते, बियाणे साठेबाजांवर रोहित पवारांची करडी नजर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 एप्रिल 2020

शेतकऱ्यांच्या येणाऱ्या तक्रारींचे वेळेवर निराकरण करा, साठेबाज सापडल्यास तात्काळ कारवाईच्या सूचना आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

कर्जत : आमदार रोहित पवार यांनी नुकतीच कर्जत-जामखेड मतदारसंघातील अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खरीप हंगाम आढावा बैठक घेतली. खरीपाचे नियोजन करताना या  काळात कोणाकडूनही साठेबाजी आणि भाववाढ होणार नाही, याकडे सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचना केल्या. तसे आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला.

या बैठकीत आमदार पवार यांनी खरीपासाठी लागणारे विविध प्रकारचे बी- बियाणे, खते व औषधे यांची उपलब्धता-पुरवठा, त्याच्या असणाऱ्या किंमती आदी नियोजनाचा आढावा घेतला.  शेतकऱ्यांच्या येणाऱ्या तक्रारींचे वेळेवर निराकरण करा, साठेबाज सापडल्यास तात्काळ कारवाईच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या वेळी मतदारसंघातील किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला व किती जणांचा पीक विमा अडकला आहे, याबाबतही चर्चा करण्यात आली.

सध्या कोरोनाबाबत लढण्यासाठी राज्य प्रशासनाकडुन संघर्ष सुरू असताना आमदार पवार यांनी राज्यभर आपल्या मदतीचा हात दिला आहे. आज घेण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग खरीप आढावा बैठकीत लॉक डाऊन असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली तसेच त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेली ही पहिलीच बैठक आहे.

बैठकीत तहसीलदार छगन  वाघ, गटविकास अधिकारी अमोल जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी राजाराम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी रुपचंद जगताप, कृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष विक्रम गदादे व प्रतिनिधी दत्तात्रेय भोसले आदीनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभाग नोंदविला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख