रोहित पवार भाजपकडून कर्जत पंचायत समिती हिसकावून घेणार?

पंचायत समितीत आठ सदस्य आहेत. त्यात राष्ट्रवादीचे चार, भाजपचे तीन आणि शिवसेनेचा एक असे पक्षीय बलाबल आहे.
rohit_pawar_karjat_jamkhed
rohit_pawar_karjat_jamkhed

कर्जत (नगर) : पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यापासून कर्जत तालुक्‍यातील राजकारणाने पुन्हा उचल खाल्ली आहे. भाजपवर कडी करीत राष्ट्रवादी-कॉंग्रेसने शिवसेनेसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. आता भाजपाच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीतही हा प्रयोग राबवून आमदार रोहित पवार पुन्हा एकदा विजयाची गुडी उभारण्यासाठी सज्ज झाले आहेत. 


तर दुसरीकडे भाजपनेही फिल्डिंग लावली आहे. कर्जत पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी निघाले. त्यामुळे येथे पुन्हा एकदा महिलाराज येणार हे निश्‍चित झाले आहे. पंचायत समितीत आठ सदस्य  आहेत. त्यात राष्ट्रवादीचे चार, भाजपचे तीन आणि शिवसेनेचा एक असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेच्या मदतीने भाजपने ही पंचायत समिती ताब्यात घेतली. 


मात्र, आता विधानसभेला प्रा.  राम शिंदे यांचा रोहित पवार यांनी पराभव केला. त्याची पुनरावृत्ती पंचायत समितीत करण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. कर्जतची नगर पंचायत, तालुका बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, देखरेख संघ, दूध संघासह विविध गावांतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका उंबरठ्यावर आहेत. या संस्थांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. पंचायत समितीत सभापतीपदी सध्या भाजपच्या साधना कदम आहेत. शिवसेनेचे प्रशांत बुद्धिवंत हे उपसभापतीपदी आहेत. बुद्धिवंत यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला, तर राष्ट्रवादीचे बहुमत होत सत्ता स्थापन होऊ शकते.


सभापतिपदासाठी विद्यमान सभापती साधना कदम व ज्योती शिंदे, तर राष्ट्रवादीच्या वतीने अश्विनी कानगुडे व मनीषा जाधव या पात्र आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादीकडे सध्या प्रत्येकी चार असे समसमान बलाबल असले, तरी शिवसेनेचा सदस्य राष्ट्रवादी आघाडीत सहभागी झाला, तर त्यांची सदस्य संख्या पाच होत बहुमत होईल.


भाजपचे पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे हे माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडूळे यांचे निकटवर्ती आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत पांडूळे यांनी रोहित पवार यांचा प्रचार केला. त्यामुळे गांगर्डे राष्ट्रवादीच्या गोटात गेले, तर भाजपाचे आव्हानच संपुष्टात येईल.

 बदललेली समिकरणे 
सध्या पंचायत समिती, बाजार समिती, नगरपंचायत, बहुतांश ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. सध्या तालुक्‍यात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड असे दिग्गज तालुक्‍यात आहेत. बदललेली समीकरणे आणि आमदार रोहित पवार प्रयत्नांमुळे पंचायत समितीतही भाजपवर कुरघोडी होऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com