रोहित पवार तरुण तुर्क आमदारांचा गट स्थापन करणार... - rohit pawar starts to young mla group | Politics Marathi News - Sarkarnama

रोहित पवार तरुण तुर्क आमदारांचा गट स्थापन करणार...

राजेश रामपूरकर
बुधवार, 18 डिसेंबर 2019

सर्वच युवा आमदार वेगळ्या पक्षाचे सदस्य असले तरी सकारात्मकरित्या खुल्या पद्धतीने चर्चा करीत असतो. आमच्यात पक्ष कधीच आडवा येत नाही. आजच्या काळाची गती लक्षात घेऊन वेगळे विचार मांडण्यासाठी अभ्यास केला जात आहे, असे पवार म्हणाले.

नागपूर : सध्या अनेक युवा आमदार विधानसभेत दाखल झाले आहेत. काहीजण प्रथमच निवडून आले आहेत. सर्वांना शिकायचे आहे. लांब पल्ला गाठायचा आहे. तसेच युवा व जनतेच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्षभेद बाजूला ठेवून "यंग एमएलए ग्रुप स्थापन' करण्याचा विचार असल्याचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी सांगितला.

सुरुवातीला महाआघाडीच्या युवा आमदारांना एकत्रित करून यंग एमएलए ग्रुप स्थापन केला जाईल. त्यामार्फत मुख्यमंत्री, ज्येष्ठ आमदार, ज्येष्ठ नेत्यांचे मागर्दशन शिबिर घेण्यात येईल. गरज पडल्यास विदेशातही अभ्यास दौरे आयोजित केले जातील. राज्याच्या व युवकांच्या समस्या समजाऊन घेतल्या जातील. राज्यातील 40 ते 45 टक्के लोकसंख्या 30 वर्षांखालील तरुणांची आहे. युवकांचे प्रश्‍न वेगळे आहेत. त्यांना पक्षाच्या राजकारणाशी काही देणे-घेणे नसते. रोजगार, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अद्यावत सोयी-सुविधा हे त्यांचे प्रधान्यक्रम आहेत. हे सर्व करीत असताना आपल्या देशाची मुख्य अर्थव्यवस्था शेतीवरच आधारित आहे. याचाही विसर पडू दिला जाणार नाही. शेतकऱ्यांचा विकास हासुद्धा आमच्या अजेंड्यावर राहणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

भारताला दिशा देण्याचे सामर्थ्य युवकांमध्ये आहे. त्यादिशेने आमच्या ग्रुपमार्फत प्रयत्न केले जातील. सुदैवाने युवा सेना नेते आदित्य ठाकरे, आदिती तटकरे यांच्यासह अनेक युवा आमदार आघाडी सरकारमध्ये आहेत. आम्ही सर्वच युवा आमदार वेगळ्या पक्षाचे सदस्य असले तरी सकारात्मकरित्या खुल्या पद्धतीने चर्चा करीत असतो. आमच्यात पक्ष कधीच आडवा येत नाही. आजच्या काळाची गती लक्षात घेऊन वेगळे विचार मांडण्यासाठी अभ्यास केला जात आहे, असे पवार म्हणाले.

राज्याची महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे. यात अडचण येऊ नये यासाठी "समान विकास कार्यक्रम' तयार करण्यात आला. आघाडी सरकारकडून सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यात येणार आहेत. त्यामुळेही महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी येथे व्यक्त केला.

सतत अभ्यास करणे गरजेचे
जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम करताना आपल्याला खूप शिकायला मिळाले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कामांच्या पद्धतीची माहिती झाली. जिल्हा परिषदेतील सदस्यांचे, प्रशासनाचे प्रश्न सोडविण्यासाठी येथे येऊन प्रयत्न केले जातील. विधिमंडळात राज्याचे विषय मांडले जात असून त्यात धोरणात्मक आणि योजनांचा समावेश असतो. येथे तयार होणारे कायदे, धोरण संपूर्ण राज्याला लागू होत असतात. त्यामुळे येथे भाषण करून होत नाही तर तथ्य मांडावे लागते. त्यामुळे सतत अभ्यास करणे गरजेचे असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख