सोशल मीडियावरही रोहित पवार ठरले 'लक्ष्यवेधी'  - Rohit Pawar grabs attention on social media | Politics Marathi News - Sarkarnama

सोशल मीडियावरही रोहित पवार ठरले 'लक्ष्यवेधी' 

सरकारनामा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता, यातील सर्वच प्रश्न लगेच चुटकीसरशी सुटतील असे नाही; परंतु यांपैकी बहुतांश प्रश्न कसे सुटतील, असा माझा प्रयत्न राहणार आहे. महाआघाडीचे सरकार हे आपल्या सर्वांचेच सरकार असल्यामुळे सगळे प्रश्न सोडविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

कर्जत (नगर) :  कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे आमदार म्हणून पहिलेच अधिवेशन होते. आपला आमदार विधानसभेत कसे आपले प्रश्न मांडतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते .  दोन्ही तालुक्‍यांतील प्रश्‍न प्रथमच अधिवेशनात मांडले गेले. . मतदारसंघासह राज्याच्याही विकासाचा आढावा आमदार पवार यांनी घेतला. रोहित पवारांच्या या लक्षवेधी कामगिरीची  चर्चा सोशल मीडियात सुरू आहे.

दशकानुदशके प्रलंबित असलेल्या कर्जत-जामखेड तालुक्‍यांतील प्रश्‍नांना थेट विधानसभेत वाचा फुटली.  जनतेचा "आवाज' आमदार रोहित पवार यांनी नागपूर अधिवेशनात उठवला. पीकविमा, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, कर्जमाफी, प्रकल्पग्रस्त, वाळूउपसा, चाराछावण्यांचे अनुदान, रस्ते, जामखेडचा पाणीपुरवठा, तसेच गोदड महाराज मंदिर परिसराचा विकास, अशा विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले.

फळबाग विमा योजनेतून लिंबू, पेरू आणि द्राक्षे आदी पिकांना वगळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने, कोणतेही पीक वगळू नये. विमा कंपनी आणि प्रशासनातील तांत्रिक अडचणींमुळे 2017-18च्या पीकविम्याची प्रलंबित रक्कम, तसेच अवकाळी पावसामुळे भरपाई द्यावी. कुकडी, उजनी आणि सीना प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनी वर्ग-2च्या असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या जमिनींचे वर्ग-1मध्ये रूपांतर कराव्यात आदी मागण्या सभागृहात केल्या . 

कर्जत तालुक्‍यातील सीना, भीमा नदीपात्रांतून होणाऱ्या अवैध वाळूउपशाला आळा घालावा, तसेच नियमानुसार चालविलेल्या चाराछावण्यांचे प्रलंबित अनुदान द्यावे. नियमभंग केलेल्या छावण्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली. दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेले शेतकरी रक्कम भरूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यांना तातडीने पैसे देण्याची मागणी त्यांनी केली.

तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्जतच्या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करावे.कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्‍यांच्या पंचायत समित्यांच्या इमारतींची पुनर्बांधणी झाली पाहिजे. जामखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेला तातडीने मंजुरी देण्याची मागणीही पवार यांनी केली. मतदारसंघातील अनेक गावांच्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. ग्रामविकास विभागाकडून याकडे तातडीने लक्ष द्यावे.

कर्जतचे ग्रामदैवत असलेले संत श्री गोदड महाराज मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणीही त्यांनी केली.आता या मागण्या जेंव्हा मान्य  होतील तेंव्हा होतील पण या तरुण आमदाराने पहिल्यांदाच विधानसभा गाठली असताना दोन्ही तालुक्यांचे प्रश्न चंगले मांडले अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे . 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख