रोहित पवार करणार कर्जत-जामखेडचे ब्रॅंडिंग

रोहित पवार करणार कर्जत-जामखेडचे ब्रॅंडिंग

पुणे : नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्जत -जामखेड एकात्मिक विकास संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या वतीने नागरिक, राज्य सरकार व सामाजिक उत्तरदायित्व निधीअंतर्गत (सीएसआर) मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यात येणार आहे. यामुळे हा विधानसभा मतदारसंघ एक ब्रॅंड होऊ शकेल अशा पद्धतीचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (ता. 11) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता. 15) पुण्यात या उपक्रमाचे उद्‌घाटन केले जाणार आहे. पुण्यातील मगरपट्टा येथील लक्ष्मी लॉन्स येथे दुपारी साडेचार वाजता या उद्‌घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, पर्यटन सचिव वलसा नायर सिंग, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, उद्योजिका दीपशिखा देशमुख आणि अभिनेते मिलिंद गुणाजी आदी उपस्थित राहणार आहेत.

पवार म्हणाले, ""या संस्थेच्या वतीने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात नागरिक, स्वयंसेवक, राज्य सरकार व विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी आदी विविध घटकांच्या मदतीने विकासकामे केली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, महिला सक्षमीकरण व पर्यटन यांसारख्या विषयांवर भर देऊन मतदारसंघाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल. एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून अभ्यास केला.

या अभ्यासात या भागातील नागरिक, सरकार व कंपन्यांचे सीएसआर यांच्या माध्यमातून विकासाला गती देता येऊ शकेल, हे दिसून आले. सर्वांत पहिल्यांदा पर्यटनावरील काम सुरू करणार आहोत. पर्यटनाला चालना दिल्यास स्थानिक युवक, महिला यांच्या विकासाला गती मिळू शकेल.'' याबरोबरच मतदारसंघासाठी खास संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर कर्जत-जामखेडला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने माहिती दिली जाणार आहे. या वेळी या उपक्रमाच्या पर्यटनविषयक समन्वयक देवयानी पवार या उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com