rohit pawar and thorat join hand together | Sarkarnama

विखेंना दूर ठेवण्यासाठी बाळासाहेब थोरात आणि रोहित पवारांची एकत्र मोर्चेबांधणी

मुरलीधर कराळे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

नगर जिल्ह्यात काॅंग्रेस व राष्ट्रवादीची ताकद वाढली. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेत दिसणार...

नगर ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे जिल्हा परिषदेवर वर्चस्व कोणाचे, याबाबत आता उत्सुकता आहे.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिवसेना-काॅंग्रेस-राष्ट्रवादीची युती होऊ शकेल, असे संकेत दिले. त्यामुळे थोरात की आमदार रोहित पवार यांचे जिल्हा परिषदेवर वर्चस्व राहिल, हे आरक्षणानंतर ठरणार आहे. या निवडीत भाजपला दूर ठेवण्याचीच शक्यता आहे.

जिल्हा परिषदेत सध्या शालिनी विखे पाटील अध्यक्ष आहेत. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पुढील महिन्यांत संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी १९, काॅंग्रेस २३, भाजप १४, शिवसेना ७, क्रांतिकारी शेतकरी पक्ष ५, महाआघाडी २, कम्युनिष्ट पक्ष १, शेतकरी विचार मंच १ व जनशक्तीचा १ असे बलाबल आहे. एकूण ७३ सदस्य आहेत. 

आरक्षणावर भिस्त

जिल्हा परिषदेत यावूर्वी २०११ मध्ये सर्वसाधारण आरक्षण निघाले होते. त्यातर २०१३ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, २०१६ मध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले होते. या वर्षी कोणते आरक्षण निघते, यावर सर्वांची भिस्त आहे. सर्वसाधारणसाठी निघाल्यास राष्ट्रवादीकडून राजश्री घुले अध्यक्ष होऊ शकतात. अनुसुचित जातीसाठी निघाल्यास उमेश परहर हे अध्यक्ष होऊ शकतात. काॅंग्रेसकडून सर्वसाधारणसाठी अजय फटांगरे यांना संधी मिळू शकते. अनुसुचित जमातीसाठी आरक्षण निघाले तर केवळ काॅंग्रेसलाच अध्यक्षपद मिळू शकेल.

रोहित पवार की थोरातांचे वर्चस्व

राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार व काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदांसाठी उमेदवार ठरवू शकतील. कारण राज्यात भाजपला दूर ठेवून सत्ता स्थापनेचे घाटत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला जिल्हा परिषदेतही दूर ठेवण्याचे नियोजन होत आहे. ही घडामोड म्हणजे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा फटका मानला जातो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख