तीस वर्षे रखडलेला कर्जत बस डेपोचा प्रश्‍न रोहित पवार यांनी लावला मार्गी...

तीस वर्षे रखडलेला कर्जत बस डेपोचा प्रश्‍न रोहित पवार यांनी लावला मार्गी...

कर्जत : संपूर्ण कर्जत तालुक्‍याचे लक्ष लागून असलेला आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेला कर्जत बस डेपोचा प्रश्न अखेर आमदार रोहित पवार यांनी मार्गी लावला आहे. तब्बल तीस वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या या प्रश्नावर तोडगा काढत आमदार रोहित पवार यांनी बस डेपोला मंजुरी मिळवून आपली " पॉवर' दाखवून दिली आहे. कर्जतला बस डेपो व्हावा यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली. मात्र डेपोच्या नावाखाली केवळ बसस्थानकावरच कर्जत करांना समाधान मानावे लागले. 

तत्कालीन पालकमंत्र्यांनी दोन वेळा या कर्जतच्या बस स्थानकात बाहेरील डेपोच्या बस उभा करून त्याचे फोटोसेशन केले. मात्र प्रत्यक्षात दोन दिवसही या बससेवेचा लाभ कर्जतकरांना घेता आला नाही.तालुक्‍यासाठी बस डेपोचा प्रश्न इतका महत्वाचा असताना केवळ आश्वासने देऊन जनतेचे समाधान करण्यात आले. संपूर्ण तालुक्‍यातील वेगवेगळ्या गावांमधील विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षणासाठी कर्जत येथे येत असतात. शासकीय कामांसाठी देखील अनेक आबालवृद्ध कर्जत येथे येत असतात. मात्र अपुऱ्या बससुविधेचा त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यांची रोज होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी मतदार संघातील लोकांची मागणी लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी डेपोची मंजुरी मिळवून आपला "पवार पॅटर्न' दाखवून दिला आहे. 

डेपोसाठी अनेक राजकीय नेते, सामाजिक संघटनांनी आवाज उठवला परंतु डेपोला मंजुरी मिळवण्यासाठी आजपर्यंत कुणाला यश मिळाले नाही. महत्वाचा असलेला डेपोचा विषय मार्गी लावून पवार यांनी डेपोबाबत आजपर्यंत होत असलेल्या चर्चेला कायमचाच पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि तेथील अधिकाऱ्यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या कल्पनेत असलेला कर्जत-जामखेड मतदारसंघ विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र प्रत्येकालाच अनुभवास मिळत आहे. 
फक्त बोलणार नाही तर करूनही दाखवणार... 
तीस वर्षांपासून डेपोचा प्रश्न प्रलंबित होता. या डेपोसाठी मतदार संघातून वेळोवेळी मागणी करण्यात आली. बस डेपोचा प्रश्न मी मार्गी लावणारच हा जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे. मी फक्त बोलणारी व्यक्ती नसुन प्रत्यक्षात करणारी व्यक्ती आहे. जनतेलादिलेला शब्द मी पाळला आहे.या डेपोमुळे कर्जतकरांचा आनंद निश्‍चितच द्विगुणित होणार आहे याचे मला समाधान वाटते असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com