युवा पिढीला रोहित पवारांनी दिला 'हा' सल्ला - Rohit Pawar Advice to Youth in Buldana | Politics Marathi News - Sarkarnama

युवा पिढीला रोहित पवारांनी दिला 'हा' सल्ला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचेच आहे. राजकारणात युवकांनी येण्याबद्दल दुमत नाही, मात्र शिक्षणालाही तेवढेच महत्त्व द्या आणि समाजकारणाचा उद्देश डोक्यात ठेवून राजकारणात या. धाडस करा, असा सल्ला कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार तथा पवार घराण्याचे वारसदार रोहित दादा पवार यांनी बुलडाण्यातील युवकांना दिला

बुलडाणा : कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचेच आहे. राजकारणात युवकांनी येण्याबद्दल दुमत नाही, मात्र शिक्षणालाही तेवढेच महत्त्व द्या आणि समाजकारणाचा उद्देश डोक्यात ठेवून राजकारणात या. धाडस करा, यश तुमचेच आहे, असा सल्ला कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार तथा पवार घराण्याचे वारसदार रोहित दादा पवार यांनी बुलडाण्यातील युवकांना दिला.

येथील जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात राजर्षी शाहू फाउंडेशनच्या वतीने संदीप शेळके यांनी आयोजित केलेल्या युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी युवकांनी विचारलेल्या शेकडो प्रश्‍नांना श्री. पवार यांनी दिलखुलास उत्तरे दिली. बुलडाण्यातील युवकांचा मला अभिमान वाटतो, कारण त्यांनी विचारलेले सर्व प्रश्न हे त्यांच्या भवितव्याशी निगडित आहेत. राजकारणापेक्षा युवा पिढीला आपल्या भवितव्याची चिंता जास्त आहे, असे श्री. पवार म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मुलींच्या सामाजिक समस्या, व्यवसाय, शेतकरी कर्जमाफी, महापोर्टल, स्पर्धा परीक्षा संदर्भात येणार्‍या अडचणी, अर्थकारण, शेतीविषयक विविध समस्या, कर्जमाफी शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणीच्या काळात करावयाची मदत, महाराष्ट्रातील उद्योगधंद्या समोर येणार्‍या अडचणी, लघु व्यावसायिकांचे प्रश्न, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न, बुलडाणा जिल्ह्यात रखडलेला रेल्वेमार्ग, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय आदी विविध प्रश्न विचारून युवा आमदारांना बोलते केले. 

या सर्व प्रश्नांवर श्री. पवार यांनी दिलखुलासपणे उत्तरे देऊन आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर धाडसाने पुढे या. मेहनत करा. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर यश तुम्हाला निश्‍चित मिळेल, असा सल्ला दिला. ''मराठी माणूस धाडस करायला मागेपुढे पाहतो. पारंपरिक पद्धतीने वागतो. त्यामुळे मागे राहतो. जगाच्या ट्रेंड लक्षात घ्या. आज सुरू असणारे अनेक उद्योग-व्यवसाय काळाच्या कसोटीवर उद्या टिकणार नाहीत. त्याची माहिती घ्या. मोबाईल आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग जीवघेणे गेम खेळण्यापेक्षा जगाचा ट्रेंड माहीत करून घेण्यासाठी करा आणि स्वतःचे भविष्य उज्वल करा,'' असे ते म्हणाले.

''हे सरकार मागील काळातील सरकारपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करणारे सरकार आहे. धार्मिक जातीय तेढ निर्माण करण्याऐवजी, आपल्याला कोणते सामाजिक प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न हाताळता येतील लोकांच्या हाताला काम कसे देता येईल, या पद्धतीने सरकार विचार करत आहे,'' हे सांगतानाच श्री. पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कशा पद्धतीने अनेक संधी असताना केवळ कृषिमंत्री पद स्वीकारले, शेतकर्‍यांच्या हिताचे किती निर्णय घेतले, त्यामुळे आज कोणता लाभ होत आहे, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख