रोहन देशमुखांची तुळजापुरात चव्हाण यांच्या विरोधात चर्चा!

लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघात वीस वर्षांत यंदा प्रथमच कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकदिलाने काम केले. दोन्हीही कॉंग्रेसच्या एकीचे बळ विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का, याची आता उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून इच्छुकांनी विधानसभेची तयारीही सुरू केली आहे.
रोहन देशमुखांची तुळजापुरात चव्हाण यांच्या विरोधात चर्चा!

उस्मानाबाद ः लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. यात परजिल्ह्यातील बार्शी (जि. सोलापूर) आणि औसा (जि. लातूर) या मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील उमरगा येथे शिवसेना, तुळजापूरला कॉंग्रेस, उस्मानाबाद आणि परंडा येथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. दोन्ही कॉंग्रेसची नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीत एकत्रित आल्याने विधानसभा निवडणुकीत त्याचा दोन्ही कॉंग्रेसला फायदा होऊन जागा राखण्यात यश मिळेल, असा अंदाज आहे. 

विधानसभेसाठी उस्मानाबादेत 2009 आणि 2014 मधील निवडणुकीत राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यात अटीतटीच्या लढती झाल्या. यंदाच्या निवडणुकीत ते दोघे आमनेसामने होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच मतदारसंघात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असणार हे स्पष्ट होईल. तरीही राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चना पाटील, तर शिवसेनेकडून नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नावाची चर्चा आहे. 

तुळजापूर मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे मधुकरराव चव्हाण आमदार आहेत. 1999 पासून आतापर्यंतच्या निवडणुकांत ते सलग विजयी झालेत. येथे विविध पक्षांकडून इच्छुकांची गर्दी आहे. कॉंग्रेसकडून चव्हाण हेच पुन्हा उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. युतीत हा मतदारसंघ भाजपकडे असल्यामुळे तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन यांच्या नावाची चर्चा आहे. सध्या राष्ट्रवादीत असलेल्या अशोक जगदाळेंनीही निवडणुकीची तयारी चालवली आहे. ते कोणत्या पक्षाकडून की अपक्ष लढतात, याची उत्सुकता आहे. चारपैकी भाजपकडे हा एकमेव मतदारसंघ असल्यामुळे इच्छुकांची गर्दी आहे.
 
उमरगा मतदासंघात शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी 2009 आणि 2014 मधील निवडणुकीत सलग विजय मिळवला. 2009 मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यापूर्वी प्रा. रवींद्र गायकवाड आमदार होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार झाले. शिवसेनेने यंदा त्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. हा नाराज गट आमदार चौगुलेंना मदत करणार का, याची उत्सुकता आहे. शिवाय शिवसेनेकडे सध्यातरी तुल्यबळ उमेदवार नसल्याने पुन्हा चौगुलेच उमेदवार असतील. कॉंग्रेसकडून अद्यापही तुल्यबळ उमेदवाराचे नाव पुढे आले नसले तरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव यांची चर्चा आहे. औशाचे आमदार बसवराज पाटील यांचे मतदारसंघामध्ये वर्चस्व आहे. ते ठरवतील तोच कॉंग्रेसचा उमेदवार असेल.

 
परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राहुल मोटेंनी सलग तीनदा विजय मिळवलाय. एकेकाळी शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीने जम बसवला आहे. यंदाही आमदार मोटे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून उपनेते, विधान परिषदेचे सदस्य प्रा. तानाजी सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. 

निकाल ठरवणार उमेदवारी 
मागील दोन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत रंगली. यंदाच्या लोकसभेत हे दोघे समोरासमोर ठाकलेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतरच विधानसभेसाठी कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असेल, हे कळेल. 

असा आहे राजकीय पट 
- दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांचे मनोमिलन आघाडीसाठी फायदेशीर 
- शिवसेनेसमोर अंतर्गत गटबाजीचे आव्हान 
- तुळजापूरमध्ये भाजपमधून इच्छुकांची भाऊगर्दी 
- उमरगा येथे कॉंग्रेसकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com