Road repairs outside norms will be dealth with | Sarkarnama

निकषात न बसणाऱ्या रस्त्यांसंबंधी कारवाई

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 मार्च 2017

पूर्वीच्या रस्त्यांच्या कामांबाबत चौकशी झाली आहे. दोषी कंत्राटदार, अभियंता आणि कर्मचाऱ्यांना अटकही झाली आहे. निकषांत न बसणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे केल्याचे भविष्यात आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

मुंबई - शहरातील सुस्थितीतील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतचा निर्णय घेऊन गैरव्यवहार केलेल्या संबंधित अभियंते, कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. निकषात बसत नसतानाही कामे करण्यात आली असतील, तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.

मुंबईतील सुस्थितीतील रस्त्यांच्या दुरुस्ती प्रस्तावाला महापालिकेने मान्यता दिल्याबाबत अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. या प्रश्‍नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, की पूर्वीच्या रस्त्यांच्या कामांबाबत चौकशी झाली आहे. दोषी कंत्राटदार, अभियंता आणि कर्मचाऱ्यांना अटकही झाली आहे. निकषांत न बसणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे केल्याचे भविष्यात आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

''मुंबई शहरातील रस्त्यांच्या सद्यःस्थितीची प्रत्यक्ष पाहणी झाली आहे. खराब झालेले रस्ते आणि 'दोषदायित्व कालावधी - पुनर्बांधणी प्रकल्पा'त नसलेल्या रस्त्यांची यादी करून दुरुस्तीच्या 82 कोटी 18 लाखांच्या प्रस्तावास जानेवारी 2017 मध्ये पालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी घेऊनच कार्यवाही करण्यात आली आहे,'' असेही डॉ. पाटील त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख