ठाणे : मध्यमवर्गीयांचा मतदानाचा टक्का वाढल्याने शिवसेनेत उत्साह 

मतदानाने अपेक्षित टक्केवारी गाठली नसली, तरी गृहसंकुलांतील वाढलेले मतदान शिवसेनेचा उत्साह वाढवणारे ठरले.
Vichare-Paranjape
Vichare-Paranjape

ठाणे:  मतदानाने अपेक्षित टक्केवारी गाठली नसली, तरी गृहसंकुलांतील वाढलेले मतदान शिवसेनेचा उत्साह वाढवणारे ठरले. उन्हाच्या काहिलीतही मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडल्यामुळे आघाडीची चिंता वाढली आहे. मागील लोकसभा निवणुकीत हाच घटक शिवसेनेच्या विजयासाठी कारणीभूत ठरला होता.

ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 25 उमेदवार असले, तरी खरी लढत शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंद परांजपे यांच्यातच होती. विचारे यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि परांजपे यांच्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या.

 ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा येथे 45 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाल्यामुळे शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे बेलापूर, ऐरोली आणि मिरा-भाईंदर येथेही मतदानाची टक्केवारी 45 च्या पुढे गेल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार लढत दिल्याचे सांगितले जाते.

उन्हाच्या काहिलीमुळे मतदानात मोठी घट होईल, असा अंदाज व्यक्त होता; परंतु यंदा 49.23 टक्के मतदान झाल्यामुळे हा अंदाज खोटा ठरला. एकूण 23 लाख 70 हजार 273 पैकी 11 लाख 66 हजार 886 मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यांच्यात सहा लाख 47 हजार 144 पुरुष आणि पाच लाख 19 हजार 727 महिला मतदारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, मतदार स्वतःहून घराबाहेर पडत असल्याचे दृश्‍य होते. मतदान केल्यानंतर समाजमाध्यमांवर सेल्फी टाकण्याचे प्रमाण यंदा वाढले होते.

झोपडपट्टी भागाप्रमाणे हिरानंदानी इस्टेटसारख्या उच्चभ्रू पसिसरातही मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. मध्यमवर्गीय, मोठ्या गृहसंकुलांतील मतदारांतही उत्साह होता. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत मध्यमवर्गातील मोदीलाटेमुळे युतीला घवघवीत यश मिळाले होते. या वेळी मध्यमवर्गीय मतदारांचा कौल कुणाला, हे 23 मे रोजी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप नाईक ऐरोलीचे आमदार आहेत. भाजपचे नरेंद्र मेहता, संजय केळकर आणि मंदा म्हात्रे हे अनुक्रमे मिरा-भाईंदर, ठाणे आणि बेलापूर या विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हे अनुक्रमे ओवळा माजिवडा आणि कोपरी पाचपाखाडी येथील आमदार आहेत. 

ठाणे आणि ओवळा माजिवडा येथे 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाल्यामुळे आघाडीत चिंतेचे वातावरण आहे.
आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांची मदार मिरा-भाईंदर, ऐरोली आणि बेलापूर या विधानसभा मतदारसंघांवर आहे. नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघांवर गणेश नाईक यांची पकड असल्याचे मानले जाते. त्यामुळे आघाडीला नवी मुंबईतून मोठी कुमक मिळाली असल्यास लढत चुरशीची ठरेल.

विधानसभा क्षेत्रानुसार मतदान

मिरा-भाईंदर : 49.8 टक्के
ओवळा माजिवाडा : 47.52 टक्के
कोपरी पाचपाखाडी : 51.15 टक्के
ठाणे : 57.90 टक्के
ऐरोली : 43.48 टक्के
बेलापूर : 48.83 टक्के
एकूण : 49.23 टक्के

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com