दिल्लीतील दंगल गेल्या चार दशकातील सर्वात मोठी... कॉंग्रेस - भाजपचे परस्परांवर जोरदार आरोपसत्र

...आणि त्याने वाचवले एका कुटुंबालादिल्लीत गेली चाळीस वर्षे रिक्‍शा चालविणारे रिक्षाचालक रामदास चांदने यांनी सांगितलेल्या अनुभवानुसार त्यांना एका रात्री दहाच्या सुमारास गोकुलपुरी भागात सशस्त्र व हिंसक जमावाने घेरले व "जय श्रीराम' च्या घोषणा देण्यास सांगितले. चांदने यांनी प्रसंग पाहून, त्यापुढे जाऊन मंदिर वही बनाएंगे, अशी घोषणा देताच जमावाने, चाचा, तू तो अपना है असे म्हणून कपाळावर टिळा लावून त्यांना सोडून दिले. यावेळी त्यांच्या रिक्षात एक मुस्लिम दाम्पत्य बालकासह बसले होते ते थरथर कापत होते. त्यांना चांदने यांनी, बेटा, तुम्ही एक शब्दही बोलू नका अशी ताकीद दिली होती. जमावाच्या तावडीतून सुटताच या तरूणाने चांदने यांच्या पायावर अक्षरशः डोके ठेवले असाही अनुभव चांदने यांनी सांगितला.
दिल्लीतील दंगल गेल्या चार दशकातील सर्वात मोठी... कॉंग्रेस - भाजपचे परस्परांवर जोरदार आरोपसत्र

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील विविध भागांत उसळलेल्या हिंसाचारात जीव गमावणारांची संख्या 42 वर पोहोचली असून 250 जखमींपैकी अनेकजण गंभीर स्थितीत आहेत. दिल्लीच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच एस .एन श्रीवास्तव यांनी दंगलग्रस्त भागांत फिरून नागरिकांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. नायब राज्यपाल अनिल बैजल व कॉंग्रेसचे नेते तसेच दिल्ली सरकारचे मंत्रीही दंगलग्रस्तांना भेटून धीर देत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज घरे-दुकाने जाळली गेलेल्यांना तातडीने 25 हजार रूपयांचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतला. 


दरम्यान यावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांना आणखी धार चढली आहे. दंगल पेटल्यावर तब्बल 69 तासांनी पंतप्रधांनांना शांततेचे आवाहन करण्यासाठी जाग आली या कॉंग्रेसच्या हल्ल्यावर भाजपने प्रतिहल्ला चढवताना कांग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीच "सीएए'वरून लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप केला. पाच दिवस जळणाऱ्या दिल्लीतील हिंसाचारात 80 पेक्षा जास्त लोक गोळीबाराने जखमी आहेत. जाळपोळीचे सत्र काहीसे थंडावले तरी हिंसाचार सुरूच आहे. या भागात एका भंगार विक्रेत्याला जमावाने आज सकाळी मारहाण करून ठार केले. दंगलीच्या काळात दिल्ली पोलिस थंडपणे हिंसाचार पहात असल्याचा आरोप होतो तेव्हाच्या दिवसांत जमावाने नावे व धर्म विचारून विचारून लोकांवर अमानुष हल्ले चढविले. 

दंगलग्रस्त भागात आजही धुराचे साम्राज्य होते. जळालेली घरे, जळालेल्या गाड्यांचे अवशेष व सर्स्व गमावलेले नागरिक यामुळे खजुरी, जाफराबाद, सीलमपूर, गोकुळपुरी भागातील सुनसान गल्ल्या व रस्ते आणखी दीनवाणे भासत आहेत. दिल्लीच्या इतिहासातील गेल्या चार दशकांतील ही सर्वांत मोठी दंगल असल्याचे नुकसानीतून समोर येत आहे. आज जुम्माच्या नमाजालाही बाहेर पडण्यासही नागरिकांची हिंमत होत नव्हती. मात्र पोलिस व अर्धसैनिक दलाच्या जवानांनी अनेकांना धीर दिला. 
दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनाईक आज (ता.29 ) निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी येणारे एस. एन. श्रीवास्तव यांना अतिरिक्त पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी देण्याची घोषणा गृहमंत्रालयाकडून करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच विशेष पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी मिळालेले श्रीवास्तव यांनी गेल्या दोन दिवसांप्रमाणे आजही दंगलग्रस्त भगात जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. 

नायब राज्यपाल बैजल यांनीही नागरिकांना धीर दिला. 
दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दंगलीत घरे जळालेल्यांना 25 हजार रूपयांची मदत तातडीने देण्याची घोषणा केली. आगामी 2-3 दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाचे नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम पूर्ण झाल्यावर उर्वरीत मदतही त्वरित देण्यात येईल असेही केजरीवाल यांनी सांगितले. सर्वस्व गमावलेल्यांना तंबूंमध्ये आसरा व दोन वेळचे जेवण देण्याचे काम सरकारतर्फे सुरू होतेच. आता त्यात शिवविहार व मौजपूरसह अनेक भागांतील स्थानिक गुरूद्वारा, मशिदी व अन्य सेवाभावी संस्थांची भर पडली आहे. 

ईशान्य दिल्लीतील चार उपविभागीय कार्यालयांत चारऐवजी 18 सहाय्यक जिल्हाधिकारी नियुक्त रहातीलल अनेक भागांत तात्पुरते तंबूही उभारण्यात आल्याचे असेही केजरीवाल यांनी जाहीर केले. दरम्यान ईशान्य दिल्लीतील केंद्रांवर 2 मार्चपासून पुढे होणारे 10 वी - 12 वी परीक्षांचे सारे बोर्डाचे पेपर निर्धारित तारखांनाच घेण्यात येतील असे सीबीएसईने जाहीर केले आहे. यापूर्वी जे पेपर रद्द झाले होते त्यांच्या नव्या तारखाही लवकरच जाहीर केल्या जातील. बोर्डाच्या परीक्षांसाठी दिल्ली पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 
राजकीय आरोप-प्रत्यारोप 
दंगलीच्या ज्वाळांवर पोळी भाजून घेण्याचे राजकीय पक्षांतील स्पर्धा पाहून सर्वसामान्य नागरिकांत तीव्र प्रतिक्रिया आहेत. राजकीय वादावादी आजही सुरू राहिली. कॉंग्रेसने मोदी सरकारला राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला दिल्यावर खवळलेल्या भाजपने, आम्हाला कॉंग्रेसने राजधर्मावर प्रवचने देऊ नये असे सुनावले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 2002 च्या गुजरात दंगलीवेळी मोदी यांनाच राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला होता त्यामुळे कॉंग्रेसच्या ताज्या सल्ल्याने भाजपचा तिळपापड झाला आहे. 
कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी, सीएएवर लोकांच्या भावना भडकावल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर केला रामलीला मैदानावरील सभेत आर या पारची भाषा करणाऱया सोनिया गांधी जमावाला भडकावणारी भाषा वापरल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. ते म्हणाले की सीएए हा कायदा पूर्ण लोकशाही पध्दतीने व संसदेत विस्ताराने चर्चेनंतर मंजूर झाला आहे. कॉंग्रेस सरकारनेच 2010 मध्ये एनपीआर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दहा वर्षात काही केले नाही व आम्ही केले तर हाच पक्ष लोकांना भडकावतो आहे. भाजप संवेदनशील विषयांचे राजकारण कधीही करत नाही असेही प्रसाद म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com