अरूण नरकेंची निवृत्ती महाडिकांसाठी अडचणीची

"करवीर'च्या राजकारणातून श्री. नरके यांच्या नावाला पी. एन. यांचा तीव्र विरोध आहे, त्याचवेळी श्री. महाडिक मात्र श्री. नरके यांच्यासाठी आग्रही आहेत. यावरून दोन नेत्यांत मतभेद नको अशी भूमिका घेत श्री. नरके यांनी मुलगा चेतनची उमेदवारी जाहीर केली आहे.
mahadeorao mahadaik-arun narake
mahadeorao mahadaik-arun narake

कोल्हापूर ः ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांनी संघाच्या राजकारणातून जाहीर केलेली निवृत्ती आणि त्याचवेळी संघाचे माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील (आबाजी) यांची नाराजी सत्ताधाऱ्यांच्यादृष्टीने अडचणीची ठरण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीला अजून तीन महिन्याचा अवधी आहे, तोपर्यंत नेत्यांनी हे "पॅचअप' न केल्याने या निमित्ताने विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळण्याची शक्‍यता आहे.

"गोकुळ'च्या निवडणुकीची प्रक्रिया जशी पुढे जाईल, तशी विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांतील अस्वस्थेत वाढ होत आहे. 2018 मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेपासून ते आतापर्यंत संघाच्या राजकारणातील एकही गोष्ट सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झालेली नाही. संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द करण्याचे शहाणपण सुचले नसते तर यात आणखी वाढ झाली असती. मल्टिस्टेटवरून थांबलेली चर्चा आता या प्रमुख दोन संचालकांच्या नाराजी आणि निवृत्तीमुळे नको त्या गोष्टीकडे वळत आहे.

श्री. नरके हे 45 वर्षे संघाचे संचालक आहेत, दहा वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांनी संघाची स्थापना केली असली तर संघाला खऱ्या अर्थाने उर्जितावस्था श्री. नरके यांच्या कारकिर्दीत आली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात "गोकुळ' एक ब्रॅंड म्हणून अस्तित्त्वात आला. त्यात इतर संचालक आणि नेत्यांसोबतच श्री. नरके यांचाही मोठा वाटा होता. त्यांच्या जोडीला कै. चुयेकर, कै. राजकुमार हत्तरकी, कै. आनंदराव पाटील-भेडसगांवकर, रविंद्र आपटे, अरूण डोंगळे, रणजितसिंह पाटील, विश्‍वास पाटील यांच्यासारखे बिन्नीचे शिलेदार होते. दूध संस्था काढण्यात आणि त्यांना सहकार्य करण्यात या दिग्गजांचाच पुढाकार होता. किंबहूना त्या जोरावरच हे 30-40 वर्षे संघात संचालक राहिलेत.

आता निवडणुकीच्या तोंडावर श्री. नरके यांनी घेतलेली निवृत्ती सताधाऱ्यांना परवडणारी नाही. आज जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातील दूध संस्थात श्री. नरके यांना ओळखत नसलेला कोणी नसेल. त्याचवेळी दुसरीकडे या ज्येष्ठांना सोडून इतर संचालकांच्या नावावर नजर टाकली तर त्यांची ताकद किती हे सांगण्याची गरज नाही. या भरीत भर म्हणून विश्‍वास पाटील यांच्यासारखा "गोकुळ' च्या राजकारणातील "चाणक्‍य' ही नाराज आहे. श्री. पाटील हे आमदार पी. एन. पाटील यांचे नेतृत्त्व मानतात, पण पी. एन. यांनी चारवेळा फोन करूनही श्री. पाटील नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संचालकांच्या बैठकीला आलेले नाहीत किंवा त्यावर त्यांनी काही प्रतिक्रियाही दिलेली नाही. एवढेच नव्हे तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी श्री. पाटील यांची घरी जाऊन भेट घेतली तरीही त्यांची नाराजी कायम आहे. त्यामुळे या दोन नेत्यांची भुमिका सत्ताधाऱ्यांनाच अडचणीची ठरू शकते.


नरके मुलांसाठी प्रयत्नशील
"करवीर'च्या राजकारणातून श्री. नरके यांच्या नावाला पी. एन. यांचा तीव्र विरोध आहे, त्याचवेळी श्री. महाडिक मात्र श्री. नरके यांच्यासाठी आग्रही आहेत. यावरून दोन नेत्यांत मतभेद नको अशी भूमिका घेत श्री. नरके यांनी मुलगा चेतनची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याला पी. एन. पाठिंबा देतील का नाही, याविषयी शंका आहे, त्यातून पी. एन. यांच्याकडून श्री. नरके यांचे दुसरे पुत्र संदीप यांना मान्यता दिली जाऊ शकते. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संदीप हे पी. एन. यांच्यासोबत होते. पण संदीप यांची उमेदवारी श्री. नरके यांना मान्य होईल का ? हा महत्त्वाचा अडथळा पॅनेल करताना असेल.
..............
विरोधकांचे घडामोडीवर लक्ष्य
गेल्या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सत्ताधाऱ्यांसोबत असून त्यांचा विजय 40 ते 75 मतांच्या फरकांनी झाला. आज श्री. मुश्रीफ यांच्यासह गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे दोन मंत्री विरोधात ठाकण्याची शक्‍यता आहे. विधानपरिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत "गोकुळ' चे पडसाद उमटलेले आहेत. आता तर थेट "गोकुळ' चीच निवडणूक आहे आणि विरोधकही मंत्रीपदामुळे प्रबळ आहेत. पी. एन. सोडले तर सत्ताधारी पक्षांचे कोणी सत्तारूढांसोबत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com