#कारण राजकारण - युपी, मध्य प्रदेश, राजस्थानवरुन मारलेला 'नमो शाॅट' विरोधकांना सीमेपार घेऊन गेला

निर्णायक नेतृत्व, स्थिरता व सातत्य हे तीन घटक सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाला कारणीभूत ठरले. त्याचबरोबर मित्रपक्षांना बरोबर घेण्याची भाजपनेतृत्वाने दाखविलेली लवचिकता हा या उल्लेखनीय यशातील महत्वाचा घटक ठरला. या उलट विरोधी पक्षांना तोडीस-तोड पर्यायी नेतृत्व मतदारांपुढे सादर करता आले नाही व संधी असूनही समर्थ आघाडी उभारता आली नाही.
#कारण राजकारण - युपी, मध्य प्रदेश, राजस्थानवरुन मारलेला 'नमो शाॅट' विरोधकांना सीमेपार घेऊन गेला

नवी दिल्ली : निर्णायक नेतृत्व, स्थिरता व सातत्य हे तीन घटक सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाला कारणीभूत ठरले. त्याचबरोबर मित्रपक्षांना बरोबर घेण्याची भाजपनेतृत्वाने दाखविलेली लवचिकता हा या उल्लेखनीय यशातील महत्वाचा घटक ठरला. या उलट विरोधी पक्षांना तोडीस-तोड पर्यायी नेतृत्व मतदारांपुढे सादर करता आले नाही व संधी असूनही समर्थ आघाडी उभारता आली नाही. भाजपने राष्ट्रवाद, सुरक्षा व त्यासाठी साहसी पावले उचलण्याची क्षमता असलेले नेतृत्व या भावनिक मुद्यांवर प्रचार केंद्रित करुन विविध आघाड्यांवरील अपयश झाकण्यात यश मिळविले. विरोधी पक्ष यास चोख प्रत्युत्तर देण्यात असमर्थ ठरले. 

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मतदारांनी दिलेला स्पष्ट कौल ही 2019च्या लोकसभा निवडणुकीची सकारात्मक बाजू मानली जाईल. परंतु मोदी यांच्या या विजयात रणनीती व युक्‍त्या किंवा चलाख्या(स्ट्रॅटेजी व टॅकटिक्‍स) यांचा मोठा वाटा आहे. यामध्ये पाच वर्षांच्या कामगिरीचा घटक हा चतुराईने झाकण्यात आला. त्यामुळे वाढती बेकारी, अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली संकटाची स्थिती व आर्थिक खालावलेपण, सामाजिक आघाडीवरील संघर्षाची स्थिती हे मुद्दे दुय्यम ठरले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेले "पुलवामा कांड' आणि त्याच्या प्रत्युत्तरादेखील करण्यात आलेली "बालाकोट मोहिम', सेनादलांची बहादुरी आणि या सर्व गोष्टी करणारे देशाचे साहसी नेतृत्व याचा पुरेपूर वापर प्रचारात करण्यात आला व ही निवडणूक व्यक्तिकेंद्रित करण्यात भाजपने यश मिळविले. त्यामुळेच प्रत्येक प्रचारसभेत मोदींनी मतदारांना आवाहन करताना "भाजपला मत म्हणजे मोदींना मत', "तुमचे प्रत्येक मत मोदींच्या खात्यात जाईल' अशा प्रकारचा टोकाचा व्यक्तिकेंद्रित प्रचार केला. यामुळे त्यांच्या प्रचाराला भावनिकतेचे परिमाण लाभून ते यशस्वी झाले. 

यातुलनेत विरोधी पक्षांचा प्रचार कमालीचा निष्प्रभ ठरला. राहूल गांधी यांनी काहीकाळ "चौकीदार चोर है' ही घोषणा देऊन एक लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु मतदारांना ते प्रभावित करु शकले नाहीत. एका बाजुला संरक्षण सौद्यात गैरव्यवहार झाल्याची बाब तर दुसऱ्या बाजुला सैन्याच्या बहादुरीवर मते मागणारे मोदी यातल्या विरोधाभासात मतदारांनी मोदींना अधिक ग्राह्य मानले आणि पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी साहसी निर्णय करु शकणारा नेता या त्यांच्या प्रतिमेच्या आकर्षणात मतदार गुरफटून गेले. या "युध्दस्य कथा रम्या'च्या भावनिक ओघात लोकांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्‍न मागे पडले. 

यांच्या नेतृत्वाच्या तुलनेत विरोधी पक्ष तोडीसतोड नेतृत्व मतदारांपुढे सादर करु शकले नाहीत. राहूल गांधी यांना अद्याप भारतीय मतदार गांभीर्याने घेत असल्याचे किमान या निवडणुकीने तरी सिध्द केलेले नाही. त्याचबरोबर भाजपच्या विरोधात पर्यायी आघाडी उभारण्यात विरोधकांना यश आले नाही. त्यांची आघाडी विस्कळित राहिली. त्याचे ठळक उदाहरण उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने कॉंग्रेसला त्यांच्या आघाडीबाहेर ठेवले हे होते. बिहारमध्ये लालूप्रसाद यांच्या अनुपस्थितीत त्यांचे चिरंजीव तेजस्वी हे पर्यायी नेते ठरु शकले नाहीत व मतदारांनी परिपक्व अशा नीतीशकुमार व त्यांच्या पुढाकाराने झालेल्या भाजपबरोबरच्या आघाडीला आपल्या मतांचे भरघोस दान टाकले. तेजस्वी यादव यांचे बिहारमधले गठबंधन मोदी-लाटेत टिकाव धरु शकले नाही. 

या विजयातील आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे भाजपने हिंदी पट्ट्यात आपले वर्चस्व कायम राखण्यात मिळविलेले यश होय. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा घटल्या असल्या तरी त्यात अपेक्षित मोठी घट झाली नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात व महाराष्ट्रातही भाजपने आपले राजकीय वर्चस्व टिकविण्यात यश मिळविले. याखेरीज कर्नाटकातील अनपेक्षित वाढीव यश, पश्‍चिम बंगाल आणि ओडीशातील जागांचा "बोनस' या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे 2019चा हा मोदींना मिळालेला "जनादेश' आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com