प्राजक्त तनपुरेंच्या राजीनाम्याने निवडणूक आयोगापुढेही प्रश्नचिन्ह

जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षाने राजीनामा दिल्यानंतर नव्या नगराध्यक्षाची निवड कशी करायची, याच्या प्रश्नाचे उत्तर तनपुरे यांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदा मिळणार आहे.
prajakta tanpure resings as council chief
prajakta tanpure resings as council chief

राहुरी : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काल (शनिवारी) नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सोपविला. "राज्यमंत्रिपदाची जबाबदारी वाढल्याने नगराध्यक्षपदासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. राहुरीच्या विकासाची गती कमी होऊ नये, यासाठी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे,' असे कारण देत, भावी नगराध्यक्षांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही तनपुरे यांनी दिली आहे.

राहुरी तालुक्‍यात तनपुरे यांनी पाच वर्षे विविध सामाजिक उपक्रम, तरुणांचे संघटन, विविध प्रश्नांवर आंदोलने करून स्वतःची ओळख निर्माण केली. तीन वर्षांपूर्वी जनतेतून त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. शहरात बंदिस्त गटारे, वाड्या-वस्त्यांवरील रस्ते, पथदिव्यांची कामे मार्गी लावली. वैद्य हॉस्पिटल व सरोदे वस्तीजवळील मोकळ्या भूखंडांचे सुशोभीकरण केले. गोकुळ कॉलनीत योग केंद्र, नवीन 32 व्यापारी गाळ्यांची कामे सुरू केली. पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यास सुरवात केली. प्रत्येक शाळेत स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्‍टर देऊन "डिजिटल वर्ग' करून पालिकांच्या शाळांची गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न केला.

पालिकेच्या 29 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळविली. योजनेच्या कामास लवकरच सुरवात होईल. राहुरी विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला. तनपुरे कुटुंबात 35 वर्षे आमदारकी होती; परंतु मंत्रिपदाने कायम हुलकावणी दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच आमदार झालेल्या तनपुरे यांना थेट राज्यमंत्रिपदी काम करण्याची संधी दिली.

नवीन नगराध्यक्ष कोण?
राज्यमंत्री तनपुरे यांचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. भावी नगराध्यक्ष जनतेतून, की नगरसेवकांमधून निवडला जाईल, हे निवडणूक आयोग ठरविणार आहे. दरम्यान, नवीन नगराध्यक्ष कोण, यावर चर्चा झडत आहेत. बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांचे चिरंजीव हर्ष तनपुरे यांचे नाव चर्चेत आघाडीवर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com