...आता नुसता दौरा नाही, अहवालही द्यावा लागणार !

लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आणि अधिकारीही यांचे अभ्यास दौरे हाच खरं तर अभ्यासाचा विषय आहे. करदात्या जनतेच्या लाखो रुपयांतून त्यांचा काय अभ्यास होतो, त्यांच्या ज्ञानात काय भर पडते,हे कधी कळतच नाही. तसेच या दौऱ्यांचा जनतेला काय फायदा होतो,हे ही सिद्ध होत नाही. त्यामुळे हे दौरे म्हणज निव्वळ सहल असते, ही टीका पटते. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचा नुकताच परदेशदौराही उपहासाचा विषय झाला. कचऱ्याचा प्रश्न पेटून शहराची कचराकुंडी झालेली असताना या जबाबदार पदाधिकाऱ्यांचा दौरा चोखंदळ व दक्ष अशा पुणेकऱ्यांच्या टीकेचे लक्ष्य झाला नसता,तर नवलच.
...आता नुसता दौरा नाही, अहवालही द्यावा लागणार !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकचे पदाधिकारी आणि दौरे हे तर समीकरणच झालेले आहे. हे ना ते निमित्त करीत त्यांचे देश, विदेश दौरे सुरु असतात. पदाधिकाऱ्यांच्या जोडीने अधिकारीही त्यात सामील झाले असतात. म्हणजे तेरी भी चूप,मेरी भी असा हा प्रकार. सभागृहात धड मराठी न बोलता येणारे परदेशवारीवर जातात. ज्या प्रश्नाचा अभ्यासच, नाही ते त्याच्या दौऱ्यासाठी फिरतात, म्हणजे ही चेष्टा आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टीच आहे. गत सत्ताधाऱ्यांच्या काळात, तर अशा दौऱ्यांचे पीकच आले होते. मात्र, एकाही दौऱ्याची फलनिष्पत्ती झाल्याचे आतापर्यंत दिसून आले नाही. पालिका हद्दीत सिमेंटची शेती (जंगले) असताना सेंद्रीय शेती, ती सुद्धा सिक्कीमला जाऊन पाहण्याची वा तिचा अभ्यास करण्याची खरंच गरज होती का. का फक्त ऐन उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाऊन पर्यटनाचाच बेत होता. या दौऱ्यावर लाखो रुपयांचा चुराडा झाला. साध्य,मात्र एक मोठे शून्यच. आतापर्यंत काही कोटी रुपये खर्ची पडलेल्या या दौऱ्यांचे अहवालच सादर झालेले नाहीत. त्यामुळे या खर्चिक दौऱ्यांचा रिझल्ट नापास असाच आहे. दर पंचवार्षिकचे महापौर व पदाधिकारी आणि असा दौरा हे आता समीकरणच झाले आहे. त्यामुळे ते सत्ता कुणाचीही असोत,ते सुरुच आहेत. विरोधकही अशा दौऱ्यांना विरोध करीत नाहीत,हे विशेष. 

मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपने व त्यातही स्थायी समितीने काही नवे चांगले पायंडे पाडण्यास सुरवात केली आहे. त्यातूनच त्यांनी अशा दौऱ्यांबाबत नुकताच एक चांगला निर्णय घेतला आहे. थेट त्यांनी या दौऱयांना विरोध केला नाही. तसेच त्याच्या खर्चाला मान्यताही दिली.पण ती देताना एक अट घातली. या दौऱ्यात अभ्यास काय केला, हे आता तो केलेल्यांना सांगावे लागणार आहे. दौऱ्याचा अहवाल त्यांना पालिका सभेसमोर सादर करावयास सांगण्यात आले आहे. त्यातून दौऱ्याचा हेतू साध्य होईल.तसेच अहवाल द्यावा लागणार असल्याने दौऱ्यातील हौशै,नवसे,गवसे यांची संख्या कमी होईल.परिणामी या दौऱ्यावरील नाहक उधळपट्टीही थोडी कमी होण्यास मदत होईल. 

राज्यातील पहिले संतपीठ उद्योगनगरीत टाळगाव चिखली येथे होत आहे. त्यासाठी आमदार, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्यासह 12 जण देशभरातील आठ गुरुकुलचा अभ्यास करण्यासाठी जाणार आहेत. हरिव्दार येथील पतंजलीच्या गुरुकुलमचाही त्यात समावेश आहे.या दौऱ्यावर संतसाहित्य,संतवाड्‌मय याविषयीचे तज्ज्ञ तथा जाणकार असण्याची शक्‍यता कमीच आहे.त्याऐवजी पुन्हा बहुतांश नगरसेवकच त्यात सहभागी होतील, असा अंदाज आहे.त्यामुळे ते काय व कसा अभ्यास करणार याची जाणीव सध्याच्या सजग व जनतेच्या पैशाच्या नाहक उधळपट्टीविषयी काहीशा जागरूक असलेल्या पालिकेच्या स्थायी समितीलाही आहे.त्यामुळे या दौऱ्याला परवानगी देताना त्याचा अहवाल आमसभेला सादर करण्याचा कोलदांडाही त्यांनी प्रथमच घातला आहे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com