सख्खे भाऊ, पिता-पुत्र, मामा-भाचे, काका-पुतणे एकाच वेळी नव्या विधानसभेतही

पै-पाहुण्यांचे राजकारण हे असे आहे....
सख्खे भाऊ, पिता-पुत्र, मामा-भाचे, काका-पुतणे एकाच वेळी नव्या विधानसभेतही

पुणे : राज्याच्या नव्या विधानसभेत पिता-पूत्र, सासरे-जावई, मामा-भाचे, काका-पुतण्या असे एकाच वेळी दिसणार आहेत. यातील काही जोड्या नेहमीच्या आहेत. तरी काही नव्या आहेत.

माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्रे अमित आणि धीरज हे दोघे सख्खे बंधू आमदार झाले आहेत. अमित यांनी लातूर शहरातून आणि धीरज यांनी लातूर ग्रामीणमधून विजय मिळवला. सख्खे बंधू एकाच वेळी सभागृहात असण्याची ही पहिलीच वेळ असेल.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातव्यांदा विधानसभेत आले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे चुलत पुतणे रोहित हे सु्द्धा आता सभागृहात दिसतील. अजित पवार यांचे दुसरे नातेवाईक राणा जगजितसिंह हे पण सभागृहात असतील. पण ते या वेळी सत्ताधारी तर पवार हे विरोधी बाकांवर असतील.  

काॅंग्रेसचे विश्वजित कदम यांच्यासोबत त्यांचे मावसबंधू विक्रम सावंत आणि त्यांच्या बहिणीचे दीर संजय जगताप हे पण आता आमदार झाले आहेत. 

माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे जावई संग्राम थोपटे ही जोडी पुन्हा सभागृहात दिसेल. बबनदादांचे बंधू संजय शिंदे हे पण आता करमाळ्याचे आमदार म्हणून सभागृहात असतील. सासरे-जावईबापूंची एक जोडी यंदा विधानसभेत नसेल. शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव झाला. त्यांचे जावई संग्राम जगताप हे दुसऱ्यांदा निवडून आले. त्यामुळे ही जोडी दिसणार नाही. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर येथून तर त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे राहुरीमधून निवडणूक जिंकले. तनपुरे यांनीच कर्डिले यांचा पराभव केला. त्यामुळे मामा-भाचे अशी नवीन जोडी विधानसभेत असेल. विधानसभेत सर्वात ज्येष्ठ सदस्य (सलग आठ वेळा निवडून आलेले) बाळासाहेब थोरात यांच्या भाचेसून मोनिका राजळे आणि भाचेजावई शंकरराव गडाख हे तिघेही आता आमदार झाले आहेत. भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव पाचपुते व  शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक हे दोघे व्याही  नव्या सभागृहात आहेत. नाईक यांच्या कन्येचा पाचपुते यांचा मुलगा विक्रम यांच्याशी विवाह झाला आहे. 

वसईमधून हितेंद्र ठाकूर तर त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर हे नालासोपारा मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले. छगन भुजबळ व त्यांचे पुत्र पंकज अशी जोडी या वेळी दिसणारन नाही. पंकज यांचा नांदगावमध्ये पराभव झाल्याने ते आमदार झाले नाहीत.

दोन्ही सभागृहांत पै-पाहुणे

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर विधानसभेवर निवडून गेल्याने सासरे एका सभागृहात आणि जावई दुसऱ्या सभागृहात असे चित्र राहील. आधी दोघेही एकाच सभागृहात म्हणजे विधान परिषदेत होते. तसेच मंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य रामदास कदम यांचे पुत्र योगेश हे नव्या विधानसभेचे सदस्य झाले आहेत. काॅंग्रेसचे नेते सतेज पाटील हे विधान परिषदेत आहेत. त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे विधानसभेत नव्याने आमदार झाले आहेत. विधानसभेचे आमदार संग्राम जगताप यांचे वडिल अरुणकाका हे विधान परिषदेचे सदस्य आहेतच. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे विधानसभेत आणि त्यांचे मेव्हणे सुधीर तांबे हे विधान परिषदेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com