Relationship with sugar for tea now I have become sugar commissioner, says sourbh rao | Sarkarnama

चहात घेण्यापुरताच साखरेशी संबंध...पण आता साखर आयुक्त झालोय..

ज्ञानेश सावंत
बुधवार, 22 जानेवारी 2020

....

पुणे : राज्याचा साखर आयुक्त झालो आहे; पण माझा आणि साखरेचा संबंध चहापुरताच असल्याची मुश्‍किल कबुली देत, जुन्या आयुक्तांकडून खूप काही शिकेल, असे नवे साखर आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सांगितले. "जुने आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी "चाय पे चर्चा'दरम्यान मी साखर; तर त्यांना महापालिकेची माहिती देण्या-घेण्याचे आमचे ठरले आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले.

एवढ्यावरच न थांबता "गायकवाड आल्याने महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना "अच्छे दिन' आल्याचे सांगत, राव यांनी नव्या आयुक्तांचे महापालिकेत स्वागत केले. 

दुसरीकडे, "मी आल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हसण्याचे मीटर सुरू करा, मात्र आपण सारेजण लोकांसाठी काम करतो,' याची जाणीव ठेवा, असा सल्ला नवे आयुक्त शेखर गायकवाड यांनी आपल्या स्वागताच्या कार्यक्रमात दिला. 

राव यांची बदली झाल्याने त्यांचा निरोप; तर महापालिकेत आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गायकवाड यांच्या स्वागताचा छोटेखानी कार्यक्रम महापालिकेत झाला. तेव्हा, राव आणि गायकवाड यांनी सरकारी दरबारातील आपापले अनुभव मांडत जोरदार बॅटिंग केली. 

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शंतनू गोयल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सहआयुक्त अमरिश गालिंदे, ज्ञानेश्‍वर मोळक, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, व्ही.जी. कुलकर्णी, अनिरुध्द पावस्कर, माधव जगताप यांच्यासह खाते प्रमुख, आधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सूत्रसंचलन करीत राव आणि गायकवाड यांच्यासमवेतचे किस्से सांगत कार्यक्रम रंगविला.

राव म्हणाले, ""मी राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर कामे केले. मात्र, पुण्यात काम करण्याचा आनंद निराळा आहे.  बदली होईल, याची कल्पना नव्हती, अचानक कानावर आले. परंतु, पुण्यात काम केल्याने मी आता देशभर कुठेही काम करू शकतो. परंतु, साखर आयुक्त झाल्याने मला शिकावे लागणार आहे. ते मी गायकवाड यांच्याकडून शिकणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उद्याच बैठक असल्याने मुंबईला जाताना गायकवाड यांच्याशी गाडीत चर्चा केली. तसे आमचे ठरले आहे.'' 

गायकवाड म्हणाले, "मुख्यमंत्र्यांसोबत दोनदा काम केल्याने लोकप्रतिनिधींशी जुळवून घ्यायला जमते आहे. लोकप्रतिनिधींना आपली भूमिका पटवून द्यायची असते. तसे झाल्यास अडचणी येत नाहीत. लोकांचे प्रश्‍न ही माझी अडचण असेल, ते सोडविण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत.'' हा कार्यक्रमच संपताच महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते धीरज घाटे यांनी गायकवाड यांचे स्वागत केले. तर राव यांना निरोप देत, शुभेच्छा दिल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख