registrar khati campaigns for cm fadanvis | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचा प्रचार करणे प्रभारी कुलसचिवांना भोवणार ?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा प्रचार करीत असल्याची माहिती बुधवारी समोर आल्याने विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली. 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा प्रचार करीत असल्याची माहिती बुधवारी समोर आल्याने विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली. 

याप्रकरणी राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी मुख्य निवडणूक आयोगासह जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली. 

या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना खुलासा मागविण्यात आल्याचे समजते.

प्रशासकीय सेवेत असताना, सेवा अधिनियमाचे उल्लंघन करून प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील प्रभाग 35 मध्ये नरेंद्रनगर आणि सुंदरबन परिसरात भाजपाचे सत्तापक्षनेते संदीप जोशी यांच्यासमवेत पदयात्रेत सहभागी होऊन या मुख्यमंत्र्यांचा प्रचार करताना आढळले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी गळ्यात भाजपाचा दुपट्टाही घातला होता. या प्रकरणाने विद्यापीठात एकच खळबळ उडाली. 

दरम्यान, तक्रार आल्याशिवाय कुठलीही कारवाई करणार नाही अशी भूमिका कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी घेतली. त्यामुळे आजच्या राज्यपालांच्या कार्यक्रमात प्रभारी कुलसचिव म्हणून खटी उपस्थित होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी शैलेंद्र तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना खुलासा मागविला आहे. तिवारी यांनी पुरावा म्हणून डॉ. खटी यांचा फोटोही तक्रारीसोबत जोडला आहे. आता अधिकारी तपासणी करून त्याबद्दल अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. यानंतर डॉ. खटी यांच्यावर काय कारवाई होते, याकडे विद्यापीठ आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख