फिल्मसिटीच्या पुनर्विकासाला मान्यता - मुख्यमंत्री - Redevelopment plan of Film city sanctioned : CM Devendra Fadanvis | Politics Marathi News - Sarkarnama

फिल्मसिटीच्या पुनर्विकासाला मान्यता - मुख्यमंत्री

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

" करमणूक उद्योगाला चालना देण्यासाठी चित्रपटगृहांची संख्या वाढणे आवश्यक आहे. यासंदर्भात आपली प्रोड्युसर्स गिल्डसमवेत चर्चा झाली असून त्यांनी प्रस्ताव तयार करावा, असे आपण त्यांना सुचविले आहे. शासनामार्फत याकामी पूर्ण प्रोत्साहन दिले जाईल ."

मुंबई  : " सिनेरसिकांच्या मनात मुंबईतील फिल्मसिटीला विशेष स्थान आहे. या फिल्मसिटीच्या पुनर्विकासाला राज्य शासनामार्फत कालच मान्यता देण्यात आली आहे. या चित्रनगरीत जागतिक दर्जाच्या चित्रीकरण सुविधा उभ्या करण्यात येतील. शिवाय पर्यटन विकासाच्या दृष्टीनेही चित्रनगरीचा विकास करण्यात येईल, "असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले . 

मेट्रो चित्रपटगृहात   झालेल्या कार्यक्रमात बुधवारी  ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, चित्रपट निर्माते- दिग्दर्शक सुभाष घई, सूरज बडजात्या, बोनी कपूर, आयनॉक्स ग्रुपचे संचालक सिद्धार्थ जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

" करमणूक उद्योगाला चालना देण्यासाठी चित्रपटगृहांची संख्या वाढणे आवश्यक आहे. यासंदर्भात आपली प्रोड्युसर्स गिल्डसमवेत चर्चा झाली असून त्यांनी प्रस्ताव तयार करावा, असे आपण त्यांना सुचविले आहे. शासनामार्फत याकामी पूर्ण प्रोत्साहन दिले जाईल," असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत आणि करमणूक उद्योग क्षेत्रात मुंबईतील मेट्रो चित्रपटगृहाचे मोठे योगदान आहे. या चित्रपटगृहासंदर्भात आपल्या अनेक आठवणी आहेत. या चित्रपटगृहाचे नाव आता मेट्रो ऐवजी मेट्रो आयनॉक्स असे होत आहे. चित्रपटगृहाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले . 

यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्व मान्यवरांनी मेट्रो चित्रपटगृहासंदर्भातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमिताभ बच्चन, सुभाष घई, सूरज बडजात्या, बोनी कपूर यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख