नाशिक : कन्याकुमारी ते श्रीनगर हे अंतर आहे 3745 किलोमीटर. मावळत्या वर्षात निवृत्त सनदी अधिकारी व विविध उपक्रमांनी सदैव चर्चेत राहणारे महेश झगडे चाललेत तब्बल 3,832 किलोमीटर. एका अर्थाने हा एक विक्रम ठरु शकतो. त्यामुळेच ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी फिटनेस विषयी अतिशय जागरुक असतात. या यादीत महेश झगडे अग्रस्थानी राहिले आहेत. निवृत्तीनंतर ते पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे देशातील सर्वाधिक लांबीच्या कन्याकुमारी ते श्रीनगर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 ची लांबी आहे 3,745 किलोमीटर तर श्री. झगडे मावळत्या 2019 या वर्षात चाललेत 3,832 किलोमीटर, यातून त्यांच्या दोन लाख 42 हजार 725 कॅलरीज अर्थात 34 किलो चरबी खर्ची पडली. वेगळ्या शब्दात सांगायचे किंवा तुलना करायची तर हे सर्व 91 पुर्ण लांबीच्या मॅरेथॉन एवढे अंतर आहे.
शासकीय सेवेत असतांनाही त्यांचा दिनक्रम असाच ठरलेला होता. सकाळी सहाला उठणे, एक-दीड तास हलका व्यायाम, वर्तमानपत्रांचे वाचन, सकाळ नऊ ते दहा या वेळेत नाश्ता आणि दुपारचे जेवण ते एकत्रच. त्यानंतर कार्यालयात जाणे. साडे चार ते पाच या दरम्यान सांयकाळचे जेवण. त्यानंतर सायंकाळी सातला ते जॉगिंग करतात. यामध्ये ते रोज सहा मैल धावतात अन् सहा मैल जलद चालतात. यात कार्यालयीन कामाच्या स्वरुपानुसार क्वचित थोडा फार बदल होतो. मात्र त्यांचा हा नेम कधी चुकला नाही.
त्याला त्यांनी आठवड्यातून एक दिवस ट्रेकिंगची जोड दिली होती. त्यांचा हा नेम अगदी परदेशातही चुकलेला नाही. मंत्रालयात असताना ते कार्यालयात जाण्यासाठी लिफ्टचा वापर करत नसत. अगदी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये त्यांचे कार्यालय एकोणतीसाव्या मजल्यावर होते. तरीही ते जिन्याचा वापर करुनच कार्यालयात जात. त्यामुळे त्यांचा ही फिटनेस, दिनक्रम प्रशासनात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. निवृत्तीनंतरही त्यात फारसा फरक पडलेला नाही. हे विशेष, अन् उल्लेखनीय.

