नाराजी दूर करताना उमेदवारांची दमछाक

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात १०७ उमेदवारांचे १५८ अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वच पक्षांनी दाखल केलेल्या अधिकृत उमेदवारांसह पक्षाचे डमी उमेदवार व नाराज उमेदवारांच्या अर्जांचाही समावेश आहे.
नाराजी दूर करताना उमेदवारांची दमछाक

अकोला - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात १०७ उमेदवारांचे १५८ अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वच पक्षांनी दाखल केलेल्या अधिकृत उमेदवारांसह पक्षाचे डमी उमेदवार व नाराज उमेदवारांच्या अर्जांचाही समावेश आहे. डमी उमेदवार पक्षाच्या निर्देशाप्रमाणे अर्ज मागे घेणार असले तरी उमेदवारी वाटपात घोळ झाल्याचा आरोप करीत नाराज होऊन उमेदवारी दाखल करणाऱ्यांची समजूत काढताना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता. अखेरच्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर राजकीय उलथापालथ झाली. उमेदवारीची अपेक्षा बाळगून असलेल्या इच्छुकांमध्ये पक्षाने डावल्याची भावना होऊन, त्यांनी थेट पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनाच आव्हान दिले. यात भाजप, शिवसेना युतीसह काँग्रेस आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचाही समावेश आहे. पक्षासोबत अनेक वर्षांपासून प्रामाणीकपणे काम करीत असताना ज्येष्ठतेचा विचार न करता आयारामांना संधी देण्यात आल्याची नाराजी काँग्रेस आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे नाराज होऊन शेवटच्या क्षणी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत थेट अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेवून बंडखोरीचा झेंडा नेत्यांनी उभारला आहे.

कोणत्या मतदारसंघात कुणाची बंडखोरी?
अकोट -  निवडणुकीच्या तोंडावर शिवबंध बांधणारे लोकजागरमंचचे अनिल गावंडे यांनी मतदारसंघ भाजपला सोडण्यात आल्याने अपक्ष म्हणून अकोट मतदासंघातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

अकोला पश्‍चिम - काँग्रेसचे प्रदेश महासचिव माजी महापौर मदन भरगड यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी घेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. भाजपचे माजी महानराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनीही पक्षाकडून उमेदवारीबाबत विचार न झाल्याने नाराजी व्यक्त करीत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.

अकोला पूर्व - वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी न मिळाल्याने माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी पक्षातर्फेच उमेदवारी दाखल केली आहे. ते अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघात काँग्रेसतर्फे निष्ठावंतांना डावलून काँग्रेसने उमेदवारी विकल्याचा आरोप करीत ज्येष्ठ नेते अजाबराव ताले यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

बाळापूर - या मतदारसंघात सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. महायुतीचे घटक असलेल्या शिवसंग्रामतर्फे संदीप पाटील, भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. संतोष हुशे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. काँग्रेसचे प्रकाश तायडे यांना पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरला.मात्र एेनवेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला.वंचित बहुजन आघाडीतर्फे गजानन दांदळे, अश्‍विजित सिरसाट यांचेही उमेदवारी अर्ज आहेत. विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांनीही पक्षातर्फे उमेदवारी न मिळाल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीतर्फे अर्ज केला. ‘वंचित’ आघाडीचे डॉ. रहेमान खान यांनी पक्ष बदल करून लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष असलेल्या एमआयएमकडूनच बाळापूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखले केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात चांगलीच रंगत वाढली आहे.

मूर्तिजापूर - या मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपचे राजकुमार नाचणे यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचा एबी फॉर्म मिळवून उमेदवारी दाखल केली. वंचित बहुजन आघाडीचे सम्राट डोंगरदिवे यांना पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र एेनवेळी प्रतिभा अवचार यांना एबी फॉर्म मिळाला. त्यामुळे डोंगरदिवे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव गवळे यांनीही युतीत मतदारसंघ भाजपला सुटल्यानंतरही नाराजी व्यक्त करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com