बंडोबांच्या साथीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पॉवरफुल 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच बारा नगरसेवकांची केलेली आयात आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर काही बंडोबांना दिलेल्या सहाऱ्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पॉवरफुल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
NCP-final
NCP-final

अकोला : महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात स्वबळावर लढणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बंडोबांना सहारा देत अनेक राजकीय पक्षांना धोबीपछाड दिली आहे. गत निवडणुकीत पाच नगरसेवकांचे संख्याबळ असणाऱ्या राष्ट्रवादीने या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच बारा नगरसेवकांची केलेली आयात आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर काही बंडोबांना दिलेल्या सहाऱ्यामुळे राष्ट्रवादी कॉंगेस पॉवरफुल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे धुमशान जोरात सुरू आहे. या निवडणुकीच सर्वच राजकीय पक्षांनी "एकला चलो रे' चा नारा देत स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या भाजपची अकोला महापालिकेत सत्ता आहे. नगरपालिकेच्या यशानंतर महापालिकेच्या रणसंग्रामातही भाजप मुसंडी मारेल, अशी हवा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनेशी युती तुटल्यानंतर मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्‍यता असल्याने भाजपसमोर महापालिकेत सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. त्यात भर म्हणजे महापालिकेच्या मागच्या निवडणुकीत केवळ पाच नगरसेवकांचे संख्याबळ असणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सध्या जोशात आला आहे. राष्ट्रवादीची सूत्रे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्याकडे आल्यावर त्यांनी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी कॉंग्रेस, भारिप बमसं, समाजवादीसह इतरही पक्षांतील दहा नगरसेवक राष्ट्रवादीत आयात केले. त्यानंतर आक्रमक बाणा आणि मुलखमैदानी तोफ म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, युवा सेना जिल्हा प्रमुख संग्राम गावंडे यांचा प्रवेश राष्ट्रवादीसाठी नवचैतन्य आणणारा ठरला. 

गुलाबराव गावंडे आणि विजय देशमुख यांनी या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण करीत अनेक पक्षांसाठी धक्कातंत्र सुरू ठेवले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उषा विरक, भाजपच्या नगरसेविका कल्पना गावंडे यांच्यासह काही आजी-माजी नगरसेवक व प्रबळ उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या तंबूत प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेत सर्वाधिक 73 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविणार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आघाडीवर आहे. त्यातुलनेत महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपला या निवडणुकीत 72 उमेदवार उभे करता आले. कॉंग्रेसला 68 जागांवरच उमेदवार उभे करता आले.

भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेची स्थिती कमकुवत मानली जात होती. मात्र, त्यांनी अधिकृत चिन्हावर 71 उमेदवारांना उभे केले असून, काही अपक्ष उमेदवारांनाही समर्थन दिले आहे. त्यामुळे अनेक प्रभागात शिवसेनेची लढत थेट भाजपसोबत होणार आहे. भारिप-बमसंने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक प्रभागात त्यांना उमेदवारच मिळाले नाही. त्यांना 57 जागांवरच उमेदवार उभे करता आले. महापालिकेच्या रणसंग्रामात जोशात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून मुस्लिमबहुल प्रभागावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यासोबतच भाजप शिवसेनेचे प्राबल्य असणाऱ्या प्रभागात मतविभाजनाचा लाभ उचलण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com