Rebellion in Chinchwad By Shivsena Aspirat is Still There | Sarkarnama

भाजपचे पिंपरीतील बंड होणार थंड,मात्र चिंचवडची शक्यता कमी

उत्तम कुटे
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

मुख्यमंत्र्यांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील बंड उद्या थंड होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेत असा आदेश न आल्याने त्यांचे, मात्र कायम राहील,अशी चिन्हे आहेत. उद्या दुपारी बंड व पर्यायाने लढतीचे चित्र सुद्धा अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

पिंपरी : मुख्यमंत्र्यांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील बंड उद्या थंड होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेत असा आदेश न आल्याने त्यांचे, मात्र कायम राहील,अशी चिन्हे आहेत. उद्या दुपारी बंड व पर्यायाने लढतीचे चित्र सुद्धा अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

शहरातील तीनपैकी पिंपरी या सर्वात लहान मतदारसंघात बंड, मात्र सर्वात मोठे झाले आहे.तेथे युती व आघाडीतही बंडांचे निशाण फडकले आहे.तेथे शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात युतीतील मित्रपक्ष भाजप आणि आऱपीआय़ने बंडखोरी केली आहे. भाजपचे एक नाही,तर दोन आणि आऱपीआय़चा एक बंडखोर अपक्ष म्हणून रिंगणात आहे.

या राखीव जागेसाठी आरपीआय व भाजपही आग्रही होती. मात्र, ती न मिळाल्याने तेथे बंड झाले आहे. त्यावर समजुतीनंतरही ते मागे घेतले नाही,तर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने शिस्तीचा पक्ष असलेल्या भाजपमधील हे बंड थंड होईल, असा राजकीय धुरीणांचा अंदाज आहे.

तर, रामदास आठवलेंच्याही अॅडजेस्टमेंटच्या भूमिकेमुळे आरपीआयचेही बंड पिंपरीत थंड होणार आहे. तेथील भाजपचे एक  बंडखोर व राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे हे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू समर्थक आहेत. ते उद्या तलवार म्यान करतील,अशी चिन्हे आहेत. येथे शिवसेनेविरुद्ध आघाडीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्याविरुद्ध पक्षाच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत व माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे.

मात्र, हे दोघेही तरुण आहेत. त्यांना भविष्यातही ही संधी मिळण्याचा संभव आहे. त्यात शिलवंत या सौम्य प्रकृतीच्या आहेत. फक्त त्यांना अगोदर दिलेली उमेदवारी फिरवून पक्षाने नंतर ती अण्णांना दिल्याने नाराज होऊन त्यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे समजुतीनंतर त्या बंड मागे घेण्याची शक्यता आहे.

चिंचवड या राज्यातील दुसऱ्या क्रमाकांच्या मोठ्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार हे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप हे आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे पालिकेतील गटनेते राहूल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. तेथे राष्ट्रवादीने कुणालाही उमेदवारी दिलेली नाही. ते कलाटे यांनाच पुरस्कृत करण्याची दाट शक्यता आहे. त्यात शिवसेनेकडून बंडखोरांवर कारवाई करू,असे फर्मान अद्याप निघालेले नाही. त्यामुळे पिंपरीत शिवसेनेविरुद्ध भाजपचे बंड थंड होण्याची शक्यता असली, तरी चिंचवडमध्ये मात्र, भाजपविरुद्ध शिवसेनेची बंडखोरी सहजासहजी शमेल,अशी चिन्हे तूर्त तरी दिसत नाहीत.

तसे झाले,तर चिंचवडला जगताप यांच्याविरुद्ध प्रमुख मोठ्या पक्षाचा उमेदवारच राहणार नाही. त्यातून त्यांना बाय मिळणार असल्याने चिंचवडमधील बंड कायम राहील,असा अंदाज आहे. ते तसे राहिले,तर पुन्हा गेल्या वेळसारखीच जगताप विरुद्ध कलाटे अशीच लढत पुन्हा एकदा होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख