rbi gives three months period for term loan repayment in corona calamity | Sarkarnama

RBI चा मोठा दिलासा : कर्जाचे हप्ते तीन महिन्यांनी भरले तरी चालतील..

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

व्यवसाय, उद्योग हे संकटात सापडल्याने त्यांना आर्थिक सवलतींची गरज होती.

मुंबई : कोरोनामुळे घाबरलेल्या नागरिकांना रिझर्व्ह बॅंक आॅफ इंडियाने दिलासा दिला असून सर्व कर्जांचे हप्ते तीन महिन्यांसाठी नाही भरले तरी चालतील, अशी घोषणा केली. तसेच व्याजदरात (रेपो रेट) 0.75 टक्क्यांनी कट केल्याने अनेकांच्या कर्जांचे हप्त्याची रक्कम कमी होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत आज घोषणा केली. कर्जाचे तीन महिने हप्ते नाही भरले तरी त्याचा सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे दास यांनी सांगितले. केंद्र सरकारने काल 1.70 लाख कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर आज आरबीआयने घोषणा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात ०.९० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकाता दास यांनी केली. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे. गृह, वाहन, उद्योग, या साठीच्या कर्जदारांना याचा उपयोग होईल. 

सध्या दिलासा देण्याची आवश्यकता होती – मुनगंटीवार

आपण निर्णय हे मानवतेच्या दृष्टीकोनातून घेतले पाहिजेत. पुढे जाऊन पुन्हा आपण कष्ट करून अर्थव्यवस्था रूळावर आणू. सामान्यांना, मध्यम वर्गीय कुटुंबीयांना सध्या दिला देण्याची आवश्यक होती आणि रिझर्व्ह बँकेनं तो निर्णय घेतला याबाबत त्यांचं अभिनंदन, असं मत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख