दानवे यांनी आश्‍वासन दिलेल्या विधानसभा इच्छुकांचे काय होणार ?

दानवे यांनी आश्‍वासन दिलेल्या विधानसभा इच्छुकांचे काय होणार ?

औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आता भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर पूर्णवेळ दिल्लीत असणार आहेत. त्यामुळे मराठवाडा विशेषतः जालना लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत आमदार होण्याचे स्वप्न पाहत भाजपमध्ये दाखल झालेल्या इच्छुकांचे काय होणार ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी व काही प्रमाणात शिवसेनेतील अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता. अर्थात यापैकी बहुतांश लोकांना दानवे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे आश्‍वासन दिले होते. अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपमधील इनकमिंग वाढले होते. 

पाचव्या विजयात कुठलाही दगाफटका नको म्हणून रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना प्रवेश देऊन कामाला लावले होते. उदाहरण द्यायचे झाले तर पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतून दत्ता गोर्डे, मनसेतून डॉ. सुनील शिंदे, बद्रीनारायण भुमरे, कल्याण गायकवाड, तुषार शिसोदे, शेखर पाटील आदींना भाजपमध्ये प्रवेश दिला होता. यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांना आमदारकीचे तिकीट देण्याचे आश्‍वासन दिल्याचे बोलले जाते. 

अशीच काहीशी स्थिती सिल्लोड विधानसभा मतदारसंघात देखील पहायला मिळाली. शिवसेनेतून सुनील मिरकर, राष्ट्रवादीतून ठगन भागवत यांच्याशिवाय स्वपक्षातील सुरेश बनकर, ज्ञानेश्‍वर मोठे, इद्रीस मुलतानी, अशोक गरूड, श्रीरंग साळवे यांच्यासह डझनभर इच्छुकांना " यावेळी तुलाच' म्हणत आमदारकीचे स्वप्न दाखवले आहे. जालना लोकसभा मतदारसंघाशिवाय मराठवाड्यातील अनेक भागात दानवे यांनी हा प्रयोग केला होता. 

लोकसभा निवडणुकीत हेच भावी आमदार, इच्छुक दानवेंसाठी झोकून देऊन कामाला लागले. परिणामी रावसाहेब दानवे दीड लाखांच्या मताधिक्‍याने पाचव्यांदा विजयी झाले. केंद्रात त्यांना राज्यमंत्रीपदही मिळाले. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात मोठे फेरबदल करत पश्‍चिम महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यपद बहाल करण्यात आले. 

रावसाहेब दानवे यांना भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश राष्ट्रीय अध्यक्षांकडून देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीतील मंत्र्यांना अधिकाधिक वेळ आपल्या कार्यालयात थांबावे अशी सक्त ताकीद दिल्यामुळे आता दानवेंचा सर्वाधिक वेळ हा दिल्लीतच जाणार आहे. दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्याने आता इकडे आमदारकीचे स्वप्न पाहत पक्षांतर केलेल्या इच्छुकांची मात्र पंचाईत झाल्याचे चित्र आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com