रावसाहेब दानवे : वय 65 पण ; जोम पस्तिशीचा !

खाण्यापिण्याचे माझे कुठले नखरे नाहीत, लहानपणी शाळेसाठी केलेली पायपीट शरीर भक्कम करणारी ठरली. तेलकट आणि गोड पदार्थ शक्‍यतो मी टाळतो असे सांगून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या फिटनेसचे श्रेय देतात ते नियमित व्यायामाला.
रावसाहेब दानवे : वय 65 पण ; जोम पस्तिशीचा !

भोकरदन : चौथीपर्यंतचे शिक्षण गावात झाले, पुढचे शिक्षण मामाच्या गावी आणि बदनापूरला. घरापासून रोज सात ते आठ किलोमीटर पायपीट करत जावे लागायचे. लहानपणापासून चालण्याची अंगळवणी पडलेली सवय आज राजकारणात चाळीस आणि वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यावरही कायम आहे. खाण्या-पिण्याचे जास्त नखरे नाहीत, की डॉक्‍टरांनी आखून दिलेला डायट प्लान नाही. 

रोज किमान पाच किलोमीटर न चुकता चालणे, मिळेल तिथे खाणे, चमचमीत, मांसाहार करतांना तेलकट पदार्थांना बाजूला सारणे, गोड टाळणे आणि सकाळी उठून नियमित व्यायाम हेच माझ्या फिटनेसचे रहस्य आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पालेभाज्या आणि फळांवर भर देत असलो तरी पथ्य असे कुठलेही नाही, म्हणूनच राजकीय दौरे, सभा, मेळावे, बैठका, साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करूनही मला कधी थकवा जाणवत नाही. `उमर पच्चपन की दिल बचपन का` असे आपल्याकडे म्हटले जाते, पण माझ्या बाबतीत `उमर 65 की, और जोश 35 का`असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. 

चाळीस वर्ष मी राजकारणात आहे, अगदी सरपंच ते केंद्रात मंत्रिपदापर्यंतचा माझा प्रवास. या प्रवासात अनेक चढउतार, राजकीय संघर्ष, मान-अपमान, विरोध, कुरघोडी, आरोप-प्रत्यारोप अशा सगळ्याच गोष्टींना तोंड द्यावे लागते. तणाव आणि थकवा येणे सहाजिकच आहे. शेवटी मी देखील माणूसच आहे, पण जनतेचे प्रश्न सोडवतांना या सगळ्या गोष्टी विसरून नव्या जोमाने कामाला लागावे लागते. धावपळ आणि दगदग आहे म्हणून आराम करत बसलो तर ते शक्‍य नाही. त्यामुळे आरोग्य सांभाळत कामाची तारेवरची कसरत मी पार पडू शकलो. 

शालेय शिक्षण घेण्यासाठी दररोज सात ते आठ किलोमीटरची करावी लागलेली पायपीट पुढे माझ्या जीवनाचा एका भाग बनून गेली. राजकारणात आल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत पदयत्रा, सभा या निमित्ताने फिरणे होत असले तरी रोज किमान पाच किलोमीटर पायी फिरण्याचा नियम मी कुठेही असलो तरी सोडला नाही. दोन मित्र सोबत घेतले की देशभरातील घडामोडींवर चर्चा आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी साध्य होतात. नियमित फिरण्याच्या सवयीमुळे गेल्या चाळीस वर्षात माझ्या वजनाचे मीटर 72/73 च्या पुढे कधी गेले नाही. ज्या दिवशी फिरणे शक्‍य झाले नाही, त्या दिवशी रात्री उशीर घरी परततांना पाच-सहा किलोमीटर अलीकडेच गाडीतून उतरतो आणि गाडीच्या प्रकाशात पायी चालत घरी येतो. 

दिल्ली असो की भोकरदन व्यायामात खंड नाही 
खासदार असल्यामुळे मतदारसंघ, दिल्ली आणि भाजपचा नेता असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मला फिरावे लागते. रेल्वे, विमान तर कधी चारचाकी गाडीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून दिवस सुरू होतो तो रात्री दोन ते तीन किवा त्यापुढेही, वेळेची मर्यादा नाही. पण तक्रार करणे हा माझा स्वभाव नसल्यामुळे आपल्या कामाच्या गरजेनुसार शरीर बळकट आणि सदृढ बनवण्यावर मी भर दिला. अगदीच आजच्या तरुणांप्रमाणे सिक्‍स पॅक वगैरे नाही, पण वजनावर नियंत्रण ठेवत काटक शरीरयष्टी मी कमावली आहे. दिल्लीत असेन तेव्हा बंगल्याच्या आवारात, संसद परिसरात फेरफटका मारत व्यायामाचे विविध प्रकार मी नियमितपणे करत असतो. मुंबईत समुद्र किनाऱ्यावर सकाळची शुध्द हवा घेत फिरणे म्हणजे पर्वणीच. 

भोकरदनला मात्र दररोज सकाळी काही खास मित्रांसोबत गावापासून पाच-सहा किलोमीटरची पायपीट करतो. दरम्यान, मतदारसंघ आणि भोकरदनमधील राजकीय घडामोडींचा आढावा जुने मित्र शेख हमद यांच्याकडून घेतो. व्यायामात खंड नको म्हणून भोकरदन येथील बंगल्यात अनेक व्यायामाचे प्रकार आणि साहित्य बसवले आहे. त्यावर तासभर व्यायाम केला की आलेला थकवा चुटकीसरशी नाहीसा होता. दररोजचे राजकीय कार्यक्रम, दौरे, बैठका आणि त्यात भेटायला येणाऱ्यांची संख्या बरीच असते. भोकरदनला असलो की माझा दरबार भरलेला असतो. अगदी सकाळी व्यायाम सुरू असतो तेव्हापासून लोक येतात. त्या सगळ्याशी व्यायाम करतांनाच मी संवाद साधतो. त्यामुळे एकीकडे वेळेची बचत आणि समोरच्या व्यक्तीचे गाऱ्हाणे ऐकणे अशी दोन्ही कामे होतात. 

कार्यकर्त्याची आवड तीच माझी.. 
घरी जेवण्याचा योग तसा कमीच येतो, सततच्या दौऱ्यांमुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घरीच जेवावे लागते. त्यामुळे माझी स्वतःची अशी काही आवड राहिलेलीच नाही. कार्यकर्त्यांची आवड हीच माझी आवड, मग कधी ठेचा भाकरी, पिठलं, तर कधी मटन. पण हे खात असतांना चतकोर कमी हे धोरण कायम ठेवले. गोड पदार्थ टाळतो, फळ, पालेभाज्या यावर अधिक भर देतो आणि हो राजकारणात असूनही मी व्यसनापासून कोसो दूर आहे हेच माझ्या आरोग्य धनसंपदेचे गुपित आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा शिरस्ता यापुढेही कायम ठेवण्याचा माझा मानस आहे. 

( शब्दांकन : तुषार पाटील ) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com