रावसाहेब दानवेंवर शेतकऱ्यांकडून विविध प्रश्‍नांची सरबत्ती

रावसाहेब दानवेंवर शेतकऱ्यांकडून विविध प्रश्‍नांची सरबत्ती

नाशिक : भाजपने गाजावाजा करून सुरू केलेल्या शिवार संवादासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आमदार, खासदारांचा लवाजमा घेऊन ढकांबे इथे पोहोचले खरे, मात्र त्यांना शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद काही साधता आला नाही. " पैसे नसल्याने आमच्या मुलांची लग्ने होत नाहीत. तुम्ही मुलाच्या विवाहासाठी किती खर्च केला ते सांगा?' असे प्रश्‍न शेतकऱ्यांनी विचारले आणि दानवे निरुत्तर झाले. 

ढकांबे (ता. दिंडोरी) येथे काल भाजपचा शिवार संवाद झाला. यावेळी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन ते दाखल झाले होते. मात्र शेतकऱ्यांमधील अस्वस्थता सतत व्यक्त होत होती. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच विविध सूचना करीत संवाद सुरू केला."कर्जमुक्तीला भाजपचा विरोध नाही, मात्र योग्य वेळी त्याची कार्यवाही करू. आमच्या सरकारच्या काळात एकही घोटाळा झालेला नाही. सर्व कामकाज पारदर्शक होत आहे' असे श्री दानवे यांनी यावेळी सांगितले. 

त्यानंतर दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्राकडे श्री. दानवे जात असताना मित्रपक्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी कार्यकर्त्यांसह त्यांना काळे झेंडे दाखवले. तर प्रहार संघटनेने शेतमालाला योग्य भाव द्यावा. त्यासाठी 1 जून पासून शेतकरी संपावर जात आहेत. त्यावर निर्णय घ्यावा असे निवेदन दिले. त्यामुळे एकंदरच या शिवार संवादात संवाद कमी व वाद- विवादच अधिक होते. 

निःशब्द संवाद यात्रा 
खासदार दानवे यांनी प्रारंभी शहरात काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी तिथे पक्षाचे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी आग्रह करूनही त्यांना मार्गदर्शन केले नाही. यावेळी पत्रकार उपस्थित होते. प्रारंभी नेत्यांनी पत्रकारांना थांबण्याची विनंती केल्याने श्री. दानवे काही तरी बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र मंदिर विश्वस्तांचा सत्कार स्वीकारल्यावर दानवे कोणताही संवाद न साधताच तडक दिंडोरीला निघून गेल्याने शहरातही त्यांची संवाद यात्रा संवादाविनाच झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com