मुलाच्या लग्नातील "लक्ष्मी दर्शना'मुळे दानवे अडचणीत

मुलाच्या लग्नातील "लक्ष्मी दर्शना'मुळे दानवे अडचणीत

औरंगाबाद ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपला आमदार पुत्र संतोष दानवे यांच्या लग्नात केलेल्या अमाप लक्ष्मीदर्शनामुळे अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी औरंगाबादच्या आयकर आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल करत या लग्नात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी आयकर विभागाकडे केली आहे. या लग्नासाठी कोणत्या मंत्री, राजकीय पुढारी, उद्योजक, बिल्डरांनी हातभार लावला याचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. 

औरंगाबादच्या जाबिंदा इस्टेट मैदानावर आमदार संतोष दानवे व प्रसिद्ध गायक प्रा. राजेश सरकटे यांची कन्या रेणू याचा शाही विवाह सोहळा 2 मार्च 2017 रोजी पार पडला होता. या लग्नात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीवरून प्रसारमाध्यमांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यावर टीका केली होती. दीड लाख लोकांना निमंत्रण पत्रिका, 40 हजार पाहुण्यांच्या जेवणाची व्हीआयपी व्यवस्था, शहरात आलेल्या मंत्री व बड्या नेत्यांसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये बुक करण्यात आलेल्या रुम्स, मुख्यमंत्र्यांसह अख्या मंत्रिमंडळाला विवाह सोहळ्याला हजर राहता यावे यासाठी करण्यात आलेली 10 चार्टड प्लेनची व्यवस्था, विवाहासाठी उभारण्यात आलेले राजवाड्या सारखे भव्य व्यासपीठ, लग्नात मिळालेल्या महागड्या भेटवस्तू यावरून हे लग्न चर्चेत आले. या भव्य विवाह सोहळ्याचा खर्च मोठ्या उद्योगपती, बिल्डर, उच्चपदस्थ अधिकारी, पुढाऱ्यांनी उचलल्याचे बोलले जाते. या पार्श्‍वभूमीवर ऍड. असीम सरोदे यांनी 23 मार्च रोजी औरंगाबाद आयकर विभागाच्या आयुक्तांना पत्र पाठवून या लग्नातील खर्चाची चौकशी आपल्या खात्यामार्फत करावी अशी मागणी केली आहे. 
पैशाच्या अफरातफरीची शक्‍यता? 
संतोष दानवे यांच्या लग्नात खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांमध्ये अफरातफरी किंवा काळा पैसा पांढरा करण्यात आल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या लग्न समारंभाला हातभार लावणाऱ्यांचा शोध घेऊन, त्यांची कसून चौकशी करावी, तसेच कारवाईची माहिती आयकर विभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावीत असे देखील तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. 
गडकरी, जाधवांच्या घरच्या शाही लग्नांचीही चौकशी करा 
संतोष दानवे यांच्या विवाहापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीचे तसेच राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांच्या मुलाच्या लग्नात देखील कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली होती. आयकर विभागाने या लग्नाची देखील सखोल चौकशी करावी अशी मागणी ऍड. सरोदे यांनी केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com