शेतकऱ्यांनो आता रडायचं नाही तर निर्धाराने लढायचंय : रविकांत तुपकर

शेतकऱ्यांनो आता रडायचं नाही तर निर्धाराने लढायचंय : रविकांत तुपकर

अकोला : कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा नैतिक अधिकार आहे, आम्ही सरकारचे काही मागत नाही, शेतकऱ्यांची केलेली लुट परत मागत आहोत. मात्र हे सरकार सत्तेवर येवून साडेचार वर्ष होत आले तरीही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासन सरकार पुर्ण करू शकत नसेल तर, आता "मरणार नाही, लढणार आहे' असा निर्धार करून ही प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांनी आपल्या बापाच्या घामाला दाम मिळवून देण्याच्या लढ्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. 

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व देउळगावराजा तालुक्‍यातील विविध गावांत शाखा उद्‌घाटन कार्यक्रमाच्या जाहीर सभांना संबोधीत करताना बोलत होते. 
1 मे पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेटृी व रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात "शेतकरी सन्मान यात्रा' काढण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या विखरन या गावावरून या सन्मान यात्रेला प्रारंभ होउन उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण येथे या शेतकरी सन्मान यात्रेचा समारोप 9 मे रोजी होणार आहे. 

ही यात्रा बुलडाणा जिल्ह्यात 5 मे रोजी येणार असून देउळगावमही येथे यात्रेदरम्यान एल्गार मेळावा आयोजित केला आहे. तर मेहकर ते डोणगाव दरम्यान भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या सन्मान यात्रेनिमित्त रविकांत तुपकर हे सध्या जिल्ह्याचा दौरा करीत असून सिंदखेडराजा व देउळगावराजा तालुक्‍यात त्यांच्या आतापर्यंत विविध गावात सभा होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखांचे उद्‌घाटन झाले. 

देउळगाराजा तालुक्‍यातील नागणगाव, डोरव्ही, मंडपगाव, इसरूळ, डोड्रा, वाकी बु., वाकी खु, बायगाव, वाकद यासह सिंदखेडराजा तालुक्‍यातील गावामध्ये रविकांत तुपकर यांनी जाहीर सभा घेवून भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, स्व. गोपिनाथ मुंडे यांची भाजप आता राहिली नाही. आज मुंडे साहेब असते तर शेतकऱ्यावर ही वेळ आलीच नसती असे सांगून निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्याऐवजी सरकारच्या चुकीच्या धोरणावर कोणी बोलत असेल तर त्यांना देशद्रोही ठरविण्यातच मोदी भक्त धन्यता मानत आहेत. त्यामुळे मुळ मुद्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा सरकारचा हा डाव आहे. 

शेतकऱ्यांना बोंड अळीचे अनुदान अद्याप मिळाले नाही, सोयाबीन व कापसाचे दर कायम पडलेले आहेत. तुर खरेदीचा घोळ अद्याप कायम आहे. दीडपट हमी भावाची जुमलेबाजी चालुच आहे, बेरोजगारांना नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचा या सरकारला विसर पडला आहे. त्यामूळे या सरकारला सत्तेवर बसवून मोठी चूक झाल्याच्या भावना आता जनता व्यक्त करीत आहे असे त्यांनी सांगितले. 


ते म्हणाले, सरकारने नोटबंदी करून देशाचं वाटोळं केले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर देशोधडीला लागले. बेरोजगारांच्या हाताला काम नसल्यामुळे तरुणांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. केवळ उद्योगपतीचा फायदा पाहणाऱ्या भाजप सरकारचा अंत जवळ आला असून या सरकारचा कायमचा कडेलोट करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर तसेच तरुणांनी सज्ज राहण्याचे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले. 

दरम्यान देउळगाराजा व सिंदखेडराजा तालुक्‍यातील अनेक तरुणांनी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश घेतला. यावेळी कार्यक्रमाला त्यांच्या सोबत गजानन पाटील बंगाळे, बबनराव चेके, मधुकर शिंगणे, वसंतराव दहातोंडे, संतोष शिंगणे, पुंडलीकराव शिंगणे, गणेश शिंगणे, विष्णु देशमुख, गजानन रायते, प्रविण राउत, शालीग्राम सोळंकी, गणेश मुरकुट, रामेश्वर मुरकुट, देविदास पंजरकर, गणेश पंजरकर, छोटू खेडेकर, सतिश पुंगळे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com