नाती कशी जपावी हे आम्ही अरुण जेटलींकडून शिकलो - संजय राऊत

 नाती कशी जपावी हे आम्ही अरुण जेटलींकडून शिकलो - संजय राऊत

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे पडसाद आता संसदेत उमटायला लागले आहेत. आजपर्यंत सत्ताधारी बाकावर बसलेल शिवसेनेचे सदस्य आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी बाकावर बसायला लागले आहेत. शिवसेनेच्या सदस्यांनी आज संसदेजवळ आंदोलनही केले. शिवसेनेचा हा विरोधाचा मूड राज्यसभेतही दिसला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे दिवंगत सदस्य अरुण जेटली यांना आदरांजली वाहताना भाजपच्या सध्याच्या नेतृत्वाला चांगलेच टोमणे मारले 

आपल्या संपूर्ण संसदीय कारकिर्दीत प्रथमच भाजप ऐवजी चक्क कॉंग्रेस आघाडीच्या बाकांवर बसलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी जेटलींना आदरांजली वाहता वाहता सत्तारूढ नेतृत्वाला चिमटे काढले. ते म्हणाले की जेटली हे असे वकील होते की व्यक्तिगत जीवनात ते कधी खोटे बोलले नाहीत. नाती कशी जपावी हे आम्ही जेटलींकडून शिकलो. संघर्षाचे दुसरे नाव अरूण जेटली होते असेही राऊत म्हणाले. 

संगीतापासून क्रिकेटपर्यंत सगळ्या क्षेत्रांची माहिती असणारे व सगळ्या पक्षांतील मैत्रीला जपणारे राज्यसभेतील माजी सभागृहनेते व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या केवळ असण्याचीही उणीव वरिष्ठ सभागृहाला दीर्घकाळ जाणवेल अशा शब्दांत सर्वपक्षीय नेत्यांनी जेटली यांना आदरांजली वाहिली. जेटली यांचा उल्लेख वक्‍त्यांनी ज्ञानसागर व सर्वमित्र असा केला. 

जेटली व राम जेठमलानी या वर्तमान सदस्यांच्या निधनानिमित्त कामकाज अर्धा दिवस बंद ठेवण्यात आले. नाती कशी जपावी हे जेटलींकडून शिकण्यासारखे होते असा शब्दांत शिवसेनेने भाजप नेतृत्वाला चिमटा काढला. जेटली, जेठमलानी, गुरूदासदादा दासगुप्ता, जगन्नाथ मिश्रा व सुखदेवसिंग लिब्रा यांना राज्यसभेने आदरांजली वाहिली. दीर्घकाळ ज्यांच्याबरोबर काम केले त्या जेटलींबाबतचा शोकसंदेश वाचताना राज्यसभाध्यक्षांचा आवाज भरून आला. जेटलींनी साऱया पदांवर राहतानाही संसदीय मर्यादांचे कायम पालन केले असे सांगून ते म्हणाले की उदारमतवादी लोकशाहीचे ते खंदे समर्थक होते. या विषयावर मुख्य वक्‍त्यांशिवाय जे पी नड्डा, वायको, तिरूची सिवा, नवनीत कृष्णन, आरसीपी सिंह, टी के रंगराजन आदींनीही साऱया दिवंगत नेत्यांची वैशिष्ट्ये सांगितली. 

विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की जेटली यांच्याशी आपली व्यक्तिगत मैत्री होती व आमची विचारसरणी कधीही या मैत्रीच्या आड आली नाही. जेटली हे चांगले विद्यार्थी, चांगले नेते, कुशल संयोजक होते. विद्यार्थी जीवनापासून मी त्यांना पहात आलो. ते प्रत्येक क्षेत्रातच अव्वल होते. त्यांच्या निधनाने मी चांगला मित्र गमावला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले, पक्षाच्या विचाराशी मिळतीजुळते नसलेल्या अनेकांशी जेटलींची मैत्री होती. ते दिलखुलास होते. प्रत्येक पक्षात त्यांचे मित्र होते. मी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली तेव्हा जेटली हे माझ्या विरोधी गटात होते. पण निवडणूक झाल्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून अखेरपर्यंत त्यांनी क्रिकेट या विषयावरील प्रत्येक गोष्टीत माझा सल्ला घेतला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com