रत्नागिरीत सेनेचा "भगवा', भाजपचा धुव्वा 

 रत्नागिरीत सेनेचा "भगवा', भाजपचा धुव्वा 

रत्नागिरी : संपूर्ण राज्यात भाजपचा बोलबाला सुरू असताना रत्नागिरीत आलेल्या भगव्याच्या लाटेने मिनी मंत्रालयावर शिवसेनेला निर्विवाद वर्चस्व मिळाले. 55 पैकी
39 जागा शिवसेनेला, 15 राष्ट्रवादीला आणि कॉंग्रेसला एक जागा मिळवता आली; परंतु भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. भगव्याच्या लाटेत भाजपचा
धुव्वा उडाला. यापूर्वी चार वेळा युतीद्वारे सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेने पाचव्या वेळी स्वबळावर सत्ता काबीज केली. 

रत्नागिरी शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले. गेले पंधरा दिवस शिवसेना, भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात घमासान सुुरू होते.
उमेदवारीवरून दापोली, खेड, मंडणगडात रंगलेल्या सूर्यकांत दळवी विरुद्ध रामदास कदम यांच्या वादाचा फटका जिल्हा परिषदेला बसला. उत्तर भागातील पाच
तालुक्‍यांमधून 26 पैकी 14 जागाच शिवसेनेच्या पदरात पडल्या. दक्षिण भागातील चार तालुक्‍यांमधील 27 पैकी 25 जागांवर सेनेचे वर्चस्व राखले. मागील वेळेपेक्षा
राष्ट्रवादीला दोन जागा कमी मिळाल्या आहेत. कॉंग्रेसने दोन, तर भाजपने आठ जागा गमावल्या. शिवसेनेतील बंडखोरीचा फायदा उठविण्याची राष्ट्रवादीकडून जोरदार
तयारी केली होती; परंतु संगमेश्‍वर, रत्नागिरीने त्यांचे मनसुबे उधळून लावले. चिपळूण तालुक्‍यामध्ये भाजपने राष्ट्रवादीचे नेते रमेश कदम यांना आपलेसे केले; परंतु
त्याचा फायदा भाजपला झाला नाही. चिपळुणात राष्ट्रवादीने शिवसेनेला चांगलीच झुंज दिली. 

जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढतींमध्ये फुरूस (खेड) गटात अण्णा कदम यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य अजय बिरवटकर यांचा पराभव केला. करबुडे (रत्नागिरी)
गटात जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाजपचे सतीश शेवडे पराभूत झाले. तेथे शिवसेनेचे उदय बने विजयी झाले. शिरगाव गटात भाजप जिल्हाध्यक्षांच्या पत्नीला पराभवाचा
धक्‍का बसला. तेथे शिवसेना उपतालुकाप्रमुखांच्या पत्नीचा विजय झाला. कोसुंब (संगमेश्‍वर) गटात माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने यांनी माजी
राज्यमंत्री रवींद्र मानेंच्या पत्नीचा पराभव केला. सर्व जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कसबा गटात अपक्ष उमेदवार माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम यांची डाळ शिजली नाही.
जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक यांच्या पत्नी रचना महाडीक यांनी सहज विजय मिळवला. 

पंचायत समितींमध्येही शिवसेनेचा "दबदबा' 
जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमध्ये राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्‍वर, खेडमध्ये शिवसेनेने किल्ला पुन्हा शाबूत ठेवला आहे. गुहागर, दापोलीत राष्ट्रवादीने सत्ता
मिळविली आहे. दापोलीत सत्ता परिवर्तन झाले. चिपळूण, मंडणगड या दोन तालुक्‍यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन तालुके वगळता अन्य सर्व ठिकाणी शिवसेनेने दबदबा राखला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com