Ratnagiri Zilla Parishad Staff Unhappy over Tea Break Restrictions | Sarkarnama

जिल्हा परिषदेवत घोंगावतेय चहाचे वादळ; मार्च अखेरीस उद्रेक शक्‍य

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 मार्च 2020

पाच दिवसांचा आठवडा झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलल्या. जिल्हा परिषदेत त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. सायंकाळी उपहारगृहात चहाला जाण्यावर घातलेल्या बंधनांमुळे कर्मचारी संतापले आहेत

रत्नागिरी : पाच दिवसांचा आठवडा झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलल्या. जिल्हा परिषदेत त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. सायंकाळी उपहारगृहात चहाला जाण्यावर घातलेल्या बंधनांमुळे कर्मचारी संतापले आहेत. जिल्हा परिषदेवर चहाचे वादळ घोगावू लागले आहे. सायंकाळी सव्वासहानंतर गरज असली तरीही न थांबण्याच्या निर्णयाप्रत कर्मचारी पोचले आहेत. त्याचा उद्रेक मार्च अखेरच्या कामकाजावेळी होण्याची शक्‍यता आहे.

सकाळी कार्यालयीन कामकाजाची वेळ ९.४५  केली आहे. दुपारी जेवणाची वेळ १ ते २ या कालावधीत त्या-त्या कार्यालयातील पद्धतीनुसार अर्धा तास करावयाची आहे. सायंकाळी सुटण्याची वेळ ६.१५ आहे. जिल्हा परिषदेत सकाळी वेळेत येणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांची सायंकाळी घरी परतण्याची वेळ ठरलेली नसते. मार्चअखेर तर वेळेला बंधन नसते. प्रत्येक तास कामकाजासाठी वापरण्यात यावा असा दृढनिश्‍चय जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाकडून करण्यात आला आहे. 

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लेटलतिफ कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्या पाठोपाठ दुपारच्या वेळेत चहाला उपहारगृहात कोणीही जाणार नाही, असा फतवा काढला आहे. सकाळी १०  ते ११ आणि दुपारी ३.३० वाजता चहा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या टेबलजवळ आणण्याची व्यवस्था केली जावी, अशी सूचना सामान्य प्रशासनाकडून आली आहे. हे पत्र प्रत्येक विभागाकडे पाठविण्यात आले. त्यावर कर्मचाऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सकाळी कार्यालयात वेळेवर न येणाऱ्यांवरील कारवाईबाबत कर्मचाऱ्यांचे म्हणणे नाही. दुपारी चहाच्या निमित्ताने पाय मोकळे करणे किंवा शीण घालवण्यास दोन मिनिटाच्या अंतरावर उपहारगृहात कर्मचारी जातात. कामात कोणतीही कुचराई होणार नाही याची काळजी ते घेतात. तरीही बंधने घालून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यावरुन जिल्हा परिषदेत चहाचे वादळ निर्माण होत आहे. कर्मचारी वेळेपेक्षा अधिक प्रसंगी सायंकाळी उशिरापर्यंत काम करतात. प्रशासनाला सहकार्य करतात तेव्हा अशा प्रकारची बंधने घातली जाऊ नयेत, अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतली.

तीनवेळा अर्धवेळ आल्यास रजा

तीनवेळा अर्धवेळ आलेल्या कर्मचाऱ्यांची एक रजा लावण्याचे आदेशही काढण्यात आले. त्याला कडाडून विरोध होत आहे. प्रशासन अशी भूमिका घेत असेल तर मार्च एन्डींगवेळी कर्मचारी सव्वा सहानंतर कार्यालयात थांबणार नाहीत. जे काम करायचे ते दिवसभरातच करणार. वेळेत कामे झाली नाहीत तर त्याला जबाबदार अधिकारी राहतील, असे संघटना म्हणत आहे.

सामान्य प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या पत्राची शहानिशा केली जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाहीविषयी निर्णय घेऊ - रोहन बने, अध्यक्ष

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख