Ratnagiri district congress : internal battle intensifies | Sarkarnama

पक्षविरोधी कारवायांबद्दल जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षच आरोपीच्या पिंजऱ्यात !

मुझफ्फर दाऊद खान 
गुरुवार, 16 मे 2019

मुंबईतील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या टिळक भवनात 18 मे रोजी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. पक्षविरोधी कारवायांवरून बैठकीत खडाजंगी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

चिपळूण :   लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी- सिधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसने नवीनचंद्र बादिवडेकरांना उमेदवारी दिली होती. मात्र, जिल्हाध्यक्ष रमेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी बांदिवडेकरांच्या विरोधी प्रचार केल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी केल्याने तालुका प्रवक्‍त्यानीही शहांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. यामुळे जिल्हा कॉंग्रेसमधील वाद उफाळून आला आहे . 

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये अंतर्गत आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वानेच पक्षविरोधी काम केल्याचे आरोप झाले. तशा तक्रारीही वरिष्ठांकडे करण्यात आल्या. दरम्यान, मुंबईतील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या टिळक भवनात 18 मे रोजी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. पक्षविरोधी कारवायांवरून बैठकीत खडाजंगी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रीय कॉंग्रेसचे कोकणचे निरीक्षक बी. एम. संदीप यांनी कॉंग्रेसच्या मुंबईतील टिळक भवन कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले आहे. 18 मे रोजी दुपारी 12 ते 2 दरम्यान ही बैठक होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पक्षविरोधी कारवायानंतर आयोजित केलेली ही बैठक महत्वाची मानली जाते. जिल्हा कॉंग्रेसमध्ये नेहमीच नवा व जुना असे दोन गट राहिले आहेत. लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर त्वरित काहींनी पक्षविरोधी काम केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या. यामुळे टिळक भवनात होणाऱ्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या बैठकीसाठी सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर यांनी केले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख