Rationing Officers Worried about Shivbhojan Scheme | Sarkarnama

शिवभोजन योजनेचा ताण शिधावाटप कर्मचा-यांवर येणार; संघटनेने व्यक्त केली भीती 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

कर्मचारी कपातीने त्रस्त असलेल्या मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेवर, नव्या शिवभोजन योजनेचा मोठा ताण येण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी या विभागातील पदे कमी करू नयेत, उलट त्यात वाढ करावी, अशी मागणी संघटनेने अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे

मुंबई : कर्मचारी कपातीने त्रस्त असलेल्या मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेवर, नव्या शिवभोजन योजनेचा मोठा ताण येण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी या विभागातील पदे कमी करू नयेत, उलट त्यात वाढ करावी, अशी मागणी संघटनेने अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. 

26 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या शिवभोजन योजनेसाठी जी भोजनालये किंवा महिला बचत गट पात्र ठरतील, त्यांच्याकडे आवश्‍यक तेवढी जागा आहे का, याची पहाणी करणे, त्याचा अहवाल पाठवणे, ही कामे तर विभागालाच करावी लागतील. त्याचबरोबर योजनेवर नियंत्रण व देखरेख ठेवणे, स्थानिक पातळीवर रूपरेषा व नियोजन ठरवणे, त्याचे दैनंदिन अहवाल देणे ही कामे देखील खात्याकडे येण्याची शक्‍यता आहे. ही योजना राबविणारी भोजनालये, महिला बचत गट निवडण्यासाठीच्या सरकारी समितीत शिधावाटप नियंत्रक, उपनियंत्रक आदींची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे हा व अन्य भार देखील खात्यावर येण्याची भीती आहे. आम्ही कामाला घाबरत नाही, मात्र पुरेसे कर्मचारी असतील तर ही कामे सोपी होतील, असे संघटनेचे सरचिटणीस विनायक निकम यांनी सांगितले. 

मुंबई ठाणे अंतर्गत शिधावाटप यंत्रणेवर या योजनेचा मोठा ताण येणार आहे. मुंबई ठाणे शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना यंत्रणेतील कर्मचारी, अधिकारी यांची संख्या वाढणे आवश्‍यक आहे. विभागात एक हजार 890 पदे मंजूर असताना उच्चस्तरीय बैठकीत केवळ एक हजार 314 पदांना मंजूरी दिलेली आहे. शिधावाटप निरीक्षकांची 233 पदे तर लिपिकांची 230 पदे रिक्त आहेत. त्यात आता हे नवे काम विभागाकडेच येण्याची शक्‍यता असल्याने पदे कमी करू नयेत, अशी मागणी मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी भुजबळ यांच्याकडे केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख