शिवसेनेची भूमिकाच दानवे यांचा पाचवा विजय निश्चित करणार

शिवसेनेची भूमिकाच दानवे यांचा पाचवा विजय निश्चित करण्यात महत्वाची ठरेल असे दिसते.
शिवसेनेची भूमिकाच दानवे यांचा पाचवा विजय निश्चित करणार

औरंगाबाद: शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे बंड यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातुन भाजपने रावसाहेब दानवे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. खोतकर यांनी दानवे विरोधातील बाण भात्यात ठेवला असला तरी शिवसैनिक दानवेंसाठी किती प्रामाणिकपणे काम करतील यावरच त्यांचा विजय अवलंबून असणार आहे.

रावसाहेब दानवे यांना पक्षाने सलग पाचव्यांदा उमेदवारी दिली आहे. आता ते पाचवा विजय मिळवत विरोधकांना कसा चकवा देतात याकडे राज्याचे लक्ष असेल. गेल्या दोन तीन वर्षात दानवेंना जालना लोकसभा मतदारसंघात काँगेस-राष्ट्रवादी आघाडी पेक्षा शिवसेनेच्या हल्यालाच अधिक तोंड द्यावे लागले होते.

शेतकऱ्यांच्या विरोधात दानवे यांनी केलेले वक्तव्य, त्यावरून आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधात जालन्यातुन निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा याची बरीच चर्चा मतदारसंघात झाली. पुढे खोतकर-दानवे वादामुळे ती मागे पडली. 

खोतकरांनी दानवेंना आव्हान देत निवडणूक लढवण्याची घोषणा करताना दानवे शिवसेना संपवायला निघालेत, शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत असा आरोप केला होता. परंतु मुख्यमंत्री फडणवीस, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थी नंतर खोतकरांनी माघार घेतली. 

पण त्या मागची जी करणे पुढे आली आहेत त्यावरून तरी दानवे खोतकर वाद हा दोन पक्षाचा नाही तर दोन नेत्यामधील वयक्तिक होता हे आता स स्पष्ट झाले आहे. नेत्यांची दिलजमाई झाली असली तरी यात भरडल्या गेलेल्या  कार्यकर्त्यांनी मात्र वेगळी भूमिका घेण्याचे ठरवल्याचे बोलले जाते.

शिवसैनिकांनी मात्र उघडपणे कॉंग्रेसला मदत करू असा इशारा देखील दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे खोतकरांना शांत करण्यात दानवेंना यश आले असले तरी शिवसैनिकांची मने देखील त्यांना वाळवावी लागणार आहे. तरच त्यांना पाचवा विजय संपादन करता येईल.

विकासकामे जमेची बाजू

गेल्या निवडणूकीत दानवे यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड नाराजी असूनही मोदी लाटेत ते तरले होते. केंद आणि राज्यात असलेल्या सत्तेचा पुरेपूर वापर दानवे यांनी जालन्याच्या विकासासाठी करून घेतला. ड्रायपोर्ट, टेकनिकल इन्स्टिट्यूट, सिडकोची योजना, पाणी प्रश्न, आणि कोट्यवधीची रस्त्यांची सुरू असलेली कामे ही दानवेंसाठी जमेच्या बाजू म्हणता येतील.

जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. डॉ. कल्याण काळे आणि दानवेचे मित्र म्हणून ओळखले जाणारे अब्दुल सत्तार यांची नावे चर्चेत आहेत. कल्याण काळे यांनी याआधी जालन्यातुन निवडणूक लढवली असल्यामुळे त्यांना दानवेंच्या रणनितीचा चांगला अभ्यास आहे.

त्यामुळे काळे यांची उमेदवारी दानवेंना डोकेदुखी ठरू शकते. वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरद वानखेडे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली आहे. पण त्यांना पडणारी मते ही काँगेसच्या वाट्याचीच असणार आहे. याचा थेट फायदा भाजपला होईल.

दानवे यांनी गेल्या साडेचार वर्षात कार्यकर्त्याची मोठी आणि मजबूत फळी उभारली आहे. लोकसभा झाल्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभेची उमेदवारी देतो असे सांगून दानवेंनी विरोधी पक्षातील शेकडो पदाधिकारी भाजपमध्ये आणले आहेत. 

उमेदवारीच्या आशेने ते देखील दानवे यांच्यासाठी तन-मन-धनाने काम करतील असे बोलले जाते. तरी शिवसेनेची भूमिकाच दानवे यांचा पाचवा विजय निश्चित करण्यात महत्वाची ठरेल असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com