Raosaheb Danve uphelds his oratory style | Sarkarnama

माझ्या  भाषणाला शिट्ट्या - टाळ्या पड्ल्या नाही तर मी राजकारण सोडून देईन :  रावसाहेब दानवे 

तुषार पाटील 
शुक्रवार, 14 जून 2019

भाषण करायला मी स्टेजवर उभा राहिल्यावर ज्या दिवशी शिट्या वाजणार नाही तो दिवस माझ्या राजकारणाचा शेवटचा दिवस असेल, तिथून पुढे मी राजकारण सोडून देईल . -रावसाहेब दानवे

भोकरदनः " दोनवेळा आमदार, पाच वेळा खासदार झालो, आणि पुढच्या पाच वर्षांनी पुन्हा मीच जालन्याचा खासदार म्हणून निवडूण येणार आहे. एवढा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि निवडणुका जिंकलेल्या असल्यामुळे खऱ्या अर्थाने आता मी राजकारणात सर्वांचा आजोबा झालो आहे,"असे  विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील एका कार्यक्रमात केले. 

अर्जून खोतकर आणि माझ्यातील भांडण निवडणुकीच्या आधीच संपले होते, आमची सेटलमेंट झाली होती, त्यानंतर महिनाभर आम्ही दोघेही नाटक करत होतो असे जाहीर कार्यक्रमात सांगून रावसाहेब दानवे पुन्हा एकदा चर्चेत आले होते. त्यांच्या या सेटलमेंटच्या गौप्यस्फोटानंतर सारवासारव  करतांना अर्जून खोतकर यांची मात्र चांगलीच दमछाक झाली होती. 

आपल्या कधी वादग्रस्त तर कधी गंमतीशीर वाक्‍यातून भल्याभल्याची विकेट काढणारे रावसाहेब दानवे आज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आवारात व्यायामशाळा व विश्रामगृहाच्या भूमिपूजनासाठी आले होते. भाषणाच्या सुरूवातीलाच सेटंलमेट या आपल्या विधानाचा अर्थ वार्ताहराला कळलाच नाही असा टोला त्यांनी लगावला. माझी गावरान भाषा आहे, आता त्यातून कुणी काहीही अर्थ काढले तरी मी भाषा आणि बोली बदलणार नाही. 

मी ग्रामीण बोली सोडून दुसऱ्या भाषेत बोलायला लागलो तर त्यानंतर मी कधीच निवडून  येऊ शकणार नाही. त्यामुळे भाषण करायला मी स्टेजवर उभा राहिल्यावर ज्या दिवशी शिट्ट्या  - टाळ्या   वाजणार नाही तो दिवस माझ्या राजकारणाचा शेवटचा दिवस असेल, तिथून पुढे मी राजकारण सोडून देईल अशी घोषणाच रावसाहेब दानवे यांनी यावेळी केली. 

राजाभाऊ , आपण जमवून घेवू.. 

व्यासपीठावर उपस्थित असलेले कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याकडे कटाक्ष टाकत रावसाहेब दानवेंनी त्यांनाही गुगली टाकली. किती दिवस विरोध करता? यावेळी आपण नगरपालिकेत जमवून घेऊ अशी ऑफरच दिली. मी सध्या राज्यमंत्री आहे, पण लोक म्हणतात तुम्ही प्रदेशाध्यक्षच राहा, पण ते माझ्या हातात नाही, उलट पाच वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिलो हेच माझे भाग्य असल्याचेही दानवे यांनी यावेळी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख